दुचाकीसह चालक ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूर : रस्त्याने धावणाऱ्या वाहनाचा क्रमांक बघून पोलिसांंना संशय आला. चौकशीअंती वाहन चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी दुचाकीसह चालकाला ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. इरफान असिम खान असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे..

पोलिस उपनिरीक्षक बोरकुटे यांच्या नेतृत्त्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दुधडेअरी परिसरात गस्तीवर होते. यावेळी याच परिसरातील इरफान असिम खान हा दुचाकीने जात होता. त्या वाहनाचा क्रमांक संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी वाहन अडविले. तपासणीअंती वाहन चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी युवकाला आणि दुचाकी ताब्यात घेतली..

पडोली पोलिस ठाण्याअंतर्गत एका गुन्ह्यातील हे वाहन असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरण पडोली पोलिसांकडे सुपूर्द केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्त्वात पोलीस उपनिरीक्षक बोरकुटे, पद्माकर भोयर, महेंद्र बुजाडे, प्रांजल झिलपे यांच्या पथकाने केली..