महानायक बिग बी उपराजधानीत

  • सोमवारी सकाळी विमानतळावर आगमन
  • विजय बारसे यांच्या चरित्रावर आधारित हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात
  • नागपूरच्या कलावंतांनाही बिग बी सोबत अभिनयाची संधी 




नागपूर - ‘सैराट’ चित्रपटानंतर हिंदीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.  बिग बी यांचे
सोमवारी सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. तिथून थेट ते वर्धा मार्गावरील एका खासगी हॉटेलला गेले. दुपारी एक वाजता ते चित्रीकरण स्थळी रवाना झाले.

दरम्यान, बिग बी ला बघण्यासाठी नागपूरसह विदर्भांतील चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेता अमिताभ बच्चन ही जोडी हिंदीच्या रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच आली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अमिताभ बच्चन चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार असल्याचे मंजुळे यांनी स्पष्ट केले होते. ‘झुंड’ हा चित्रपट विजय बारसे यांच्या चरित्रावर आधारित आहे. बारसे यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देऊन त्यांची टीम तयार केली होती. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन हे बारसेंच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी एकूण ७० ते ८० दिवस चित्रीकरणाला लागणार असून त्यासाठी सलग ४५ दिवस अमिताभ बच्चन चित्रीकरण करणार आहेत.
नागपुरातील मोमीनपुरा, कोराडी मार्गावरील राजभवन आणि महालातील काही भागात चित्रीकरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.



या चित्रपटासाठी मंजुळे यांनी निवडलेल्या मुलांना रीतसर अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात आले असून ते आता एखाद्या नटासारखे काम करणार आहेत, अशी माहिती मंजुळे यांनी दिली. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर अशा वेगळ्या चित्रपटासाठी काम करणे हे माझ्यासाठी स्वप्नवतच आहे.  मी नेहमीच नवख्या कलाकारांबरोबर काम करण्यासाठी ओळखला जातो. यावेळी हे नवीन तरुण कलाकार आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखा दिग्गज कलाकार हे अफलातून मिश्रण पडद्यावर प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव देणारे ठरेल, असा विश्वासही नागराज यांनी व्यक्त केला. हे.