शेतक-यांच्‍या जीवनात नविन आर्थिक क्रांतीची सुरूवात


सिंचन सुविधांच्‍या माध्‍यमातुन चिचाळा येथे पाईपलाईनव्दारे सिंचन सुविधा


चंद्रपूर, दि.20 डिसेंबर - शेतक-यांना सिंचन विषयक सुविधा उपलब्‍ध करत त्‍यांचे जीवनमान उंचावण्‍याच्‍या दृष्‍टीने आम्‍ही सातत्‍याने प्रयत्‍नशील आहोत. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत चिचाळा व लगतच्‍या गावांमध्‍ये पाईपलाईनव्दारे सिंचनाची सुविधा शेतक-यांना उपलब्‍ध करण्‍यासाठी 23 कोटी रू. निधी आपण उपलब्‍ध केला आहे. बल्‍लारपूर तालुक्‍यात दहा गावांना सिंचनाच्‍या दृष्‍टीने वरदान ठरणारी पळसगांव-आमडी उपसा जलसिंचन योजना, चिचडोह बॅरेज अंतर्गत चंद्रपूर जिल्‍हयातील 28 व गडचिरोली जिल्‍हयातील 43 अशा एकूण 71 गावांना पिण्‍याचे पाणी व 11510 हेक्‍टर सिंचन क्षेत्रास लाभ मिळणार आहे. शेतात पाणी पोचत नाही म्‍हणून चिचाळा व परिसरातील शेतकरी निराश होते. त्‍यांनी ही समस्‍या आपल्‍यापुढे बोलुन दाखविली आणि त्‍यानंतर या उपाययोजनेचा मार्ग सुकर झाला. जेव्‍हा या सहा गावांमधील 2 हजार शेतक-यांच्‍या शेतांमध्‍ये हे पाणी पोहचेल तेव्‍हा एका नव्‍या आर्थिक क्रांतीची सुरूवात होईल. सिंचन सुविधेच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांच्‍या जीवनात समृध्‍दीचा आनंद निर्माण करण्‍यासाठी आपण कटिबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


जाहीर सभेपूर्वी पाईपलाईनव्दारे सिंचन सुविधा पुरविण्‍याच्‍या कामाचे भूमीपूजन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी चिचाळा व परिसरातील नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.


दिनांक 20 डिसेंबर रोजी मुल तालुक्‍यातील चिचाळा येथे पाईपलाईनव्दारे सिंचनाची सुविधा उपलब्‍ध करण्‍याच्‍या कामाच्‍या भूमीपूजन सोहळयानिमीत्‍त आयोजित जाहीर सभेत ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते प्रमोद कडू, माजी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, पंचायत समिती सभापती सौ. पूजा डोहणे, उपसभापती चंदू मारकवार, जिल्‍हा परिषद सदस्‍य पृथ्‍वीराज अवताडे, सरपंच श्रीमती सिडाम, अमोल येलंकीवार, मुख्‍य अभियंता श्री. स्‍वामी, अधिक्षक अभियंता श्री. वेमुलकोंडा, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने आदींची प्रामुख्‍याने उपस्‍थीती होती.

यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, विविध विकास कामे, पायाभूत सुविधा आदींसह शेतक-यांना सिंचन विषयक सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यावर आपण नेहमीच भर दिला आहे. चांदा ते बांदा विशेष कार्यक्रमांतर्गत मुल तालुक्‍यातील चिचाळा व नजिकच्‍या सहा गावांना शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्‍याकरिता मंजूर 23 कोटी 47 लक्ष 54 हजार रू. निधी मंजूर करण्‍यात आला असून सदर परिसरातील शेतक-यांना या माध्‍यमातून मोठी सुविधा उपलब्‍ध होणार आहे. जून 2019 पर्यंत योजना पूर्ण करण्‍याचे आदेश आपण दिले आहेत. त्‍याचप्रमाणे नलेश्‍वर मध्‍यम प्रकल्‍पाच्‍या मुख्‍य कालव्‍याचे अस्‍तरीकरणाचे काम, भसबोरण लघु प्रकल्‍पाच्‍या विशेष दुरूस्‍तीचे काम, पिपरी दिक्षीत लघु प्रकल्‍पाच्‍या विशेष दुरूस्‍तीचे काम, जानाळा लघु प्रकल्‍पाची विशेष दुरूस्‍ती, राजोली येथील माजी मालगुजारी तलावाची विशेष दुरूस्‍ती,मौलझरी लघु प्रकल्‍पाची विशेष दुरूस्‍ती, मुल येथील माजी मालगुजारी तलावाच्‍या कालाडोह पूरक कालव्‍याच्‍या विशेष दुरूस्‍तीचे काम, जामखुर्द उपसा सिंचन योजनेचे विशेष दुरूस्‍तीची कामे मंजूर करत या सर्व विशेष दुरूस्‍तीच्‍या कामांसाठी सुमारे 25 कोटी रूपयांचा निधी मंजूर करविला आहे. विशेष बाब या सदराखाली मुल आणि पोंभुर्णा या तालुक्‍यातील शेतक-यांसाठी सिंचन विहीरी आपण मंजूर केल्या आहेत. टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने 5 हजार शेतक-यांसाठी सधन शेतकरी प्रकल्‍प आपण प्रायोगिक तत्‍वावर राबवित आहोत. अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र हा अभिनव उपक्रम राबविण्‍यात येत आहे. मुल, चिरोली, दाबगाव (मक्‍ता), गोलाभूज, राजोली, टेकाडी, डोंगरगांव आदी गावांमधील माजी मालगुजारी तलावाच्‍या विशेष दुरूस्‍तीची कामे सुध्‍दा आपण मंजूर करविली आहेत.

मुल शहरात पाणी पुरवठा योजनेसाठी 28 कोटी रूपयांचा निधी आपण मंजूर केला आहे. 18 गावांसाठी 47 कोटी रू. किंमतीची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करविली आहे. मुल आणि पोंभुर्णा तालुक्‍यातील अंगणवाडया उत्‍तम व आदर्श करण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्यवाही सुरू करण्‍यात आली आहे. रोजगार, शिक्षण, आरोग्‍य या क्षेत्रांना प्राधान्‍य देतानाच कृषी क्षेत्राला सुध्‍दा आपण नेहमीच अग्रक्रम दिला आहे. शेतक-यांना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पाठवून नविन तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्‍यासाठी अभ्‍यास करण्‍यासाठी पाठविणार आहोत. या परिसरात धान क्‍लस्‍टर तयार करण्‍याचा आपला मानस आहे. चंद्रपूर जिल्‍हा रोजगारयुक्‍त बनविण्‍याच्‍या सहा सुत्री कार्यक्रमांतर्गत मिशन उन्‍नत शेती हे मिशन आपण हाती घेतले असून या माध्‍यमातुन समृध्‍द शेती, संपन्‍न शेतकरी हे ध्‍येय आपण साध्‍य करणार असल्‍याचे ते यावेळी बोलताना म्‍हणाले. सदर सिंचन सुविधेचा योग्‍य लाभ घेत शेतक-यांनी शेतात आर्गेनिक तांदुळ, गुळ तयार करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. या परिसरातील सर्व शेतजमिनींचे सॉईल हेल्‍थकार्ड आपण तयार करणार असून शेतक-यांनी या उपक्रमांना प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्‍यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते प्रमोद कडू आदींची भाषणे झालीत. आपल्‍या भाषणात बोलताना देवराव भोंगळे म्‍हणाले, केवळ विकासाचा, जनकल्‍याणाचा ध्‍यास घेत सुधीर मुनगंटीवार कार्यरत आहेत. शेतक-यांच्‍या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्‍यासाठी प्रयत्‍नशील असलेला लोकप्रतिनिधी आपल्‍याला लाभला या अर्थात या मतदार संघातील जनता भाग्‍यशाली असल्‍याचे प्रतिपादन त्‍यांनी यावेळी बोलताना केले.