३४ बेघरांना मनपाने नेले निवारागृहात

मनपाच्या आवाहनानुसार स्वयंसेवी संस्थांनी 
केले बेघर निवारात  ब्लँकेट वाटप

नागपूर : थंडीचा वाढता कहर लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेच्या वतीने संचालित बेघर निवारागृहात कर्मचाऱ्यांनी निवारा उपलब्ध करून दिला. या बेघरांना थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ब्लँकेटचे वाटपही करण्यात आले.

सीताबर्डी येथील बेघर निवारागृहाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. २६) रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानक, कस्तुरचंद पार्क याठिकाणचा सर्व्हे केला असता ३४ बेघर फुटपाथवर झोपलेले आढळून आले. अनेक गरीब तरुण जे सैन्यभरतीसाठी नागपुरात दाखल झालेले आहेत,अशा तरुणांचाही यात समावेश होता. या सर्व लोकांन सीताबर्डी बेघर निवारागृहात आणण्यात आले. तेथे त्यांना पाणी, स्वच्छतागृह,गादी, चादर आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या निराधारांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर भोजन, चहा व नाश्त्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. मनपातर्फे माय एफ.एम., क्लॉथ बॉक्स फाउंडेशन तसेच काही दानशूर समाजसेवींना ब्लँकेट वाटपासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला दाद देत त्यांनी बेघरांना ब्लँकेट वाटप केले. बेघर निवारागृहात जुने ३६ आणि नवीन ३४ असे एकूण ७० लाभार्थी आहेत.