पंजाब मध्ये एखादे सुधीर मुनगंटीवार पाहिजे:सोनू सूद

चंद्रपूर मधील विकास कार्याला बघून सिने अभिनेताही प्रभावित

चंद्रपूर/प्रतीनिधी:

चंद्रपूरमध्ये उभे राहत असलेले मोठ-मोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प, रोजगार निर्मितीसाठी उभे राहत असलेले प्रकल्प, मिशन शौर्य सारखे अभिनव प्रयोग आणि चंद्रपूर व परिसरातील चकाचक रस्ते बघितल्यावर माझ्या पंजाब या राज्यात देखील असाच एखादा नेता असावा, असे मला वाटते असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी आज येथे काढले.

            राज्याचे वित्त, नियोजन, वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर येथील दुर्गापुर,शक्ती नगर येथे पालकमंत्री फुटबॉल चषकाचे आयोजन करण्यात आले होते.  राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये नागपूरच्या संघ विजयी ठरला. तर चंद्रपूरच्या संघ उपविजेता ठरला. या संघांना पुरस्कार वितरणासाठी सिने अभिनेता सोनू सूद या ठिकाणी आले होते.चंद्रपूरच्या नागरिकांनी भरगच्च उपस्थितीत त्यांचे स्वागत केले.

           यावेळी बोलतांना सोनू सूद यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला विकास कामाचे तोंडभरून कौतुक केले. मी मूळचा पंजाब राज्याचा रहिवासी आहे.मात्र पंजाब मध्ये देखील अशा पद्धतीचा विकास कामाचा झंझावात मला बघायला मिळाला नाही. सुधीर मुनगंटीवार यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास कामांना बघून मी अतिशय प्रभावीत झालो आहे. मला अतिशय प्रामाणिकपणे याठिकाणी सांगावेसे वाटते की, असा एखादा नेता माझ्या पंजाब प्रांतामध्ये का दिला नाही ? अशी भावना या अभिनेत्यांनी लोकांच्या भरगच्च उपस्थितीत व्यक्त केली.

       यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या डायलॉगच्या मागणीला देखील पूर्ण केले. त्याच्या आगामी चित्रपटातील काही संवाद त्यांनी सादर केले. नागपूर ,चंद्रपूर ,बल्लारपूर या सर्व गावाशी आपला परिचय असल्याचे सांगत त्यांनी नागपूरशी माझे नाते असल्याचे सांगितले.इंजीनियरिंग कॉलेजला नागपूरलाच शिक्षण झाले असल्यामुळे व बल्लारपुरात अनेक मित्र असल्यामुळे हा परिसर आपल्या परिचयाचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ना.सुधीर मुनगंटीवार यांनी बोलावल्यास चंद्रपूरला पुन्हा भेट देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

            पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सोनू सूद यांचे चंद्रपूर जिल्ह्यातर्फे स्वागत केले.सोनू सूद यांना माता महांकालीचे आशीर्वाद प्राप्त होवोत. आगामी काळात त्यांच्या चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळो, अशा शुभेच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. या शहरात आलेल्या प्रत्येक माणसाला ऊर्जा प्राप्त होते. या शहराच्या कोळशामध्ये कर्तुत्वाचे हीरे तयार होतात असे सांगून त्यांनी ऑपरेशन शौर्यमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी एवरेस्ट सर करण्याचा केलेल्या भीम पराक्रमाची माहिती देखील यांना दिली. वेळात वेळ काढून त्यांनी चंद्रपूरला भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

        दुर्गापूर येथील शक्ती नगर भागातील समता स्पोर्टिंग क्लबच्यावतीने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या क्लबतर्फे फारुक शेख ,श्रीकांत देशमुख,संजय यादव, घनश्याम यादव, आदींनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, डब्ल्यूसीएलचे महाव्यवस्थापक आभास सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, रामपाल सिंग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन मोंटू सिंग यांनी केले