16 जानेवारीला विश्वास नागरे पाटील चंद्रपुरात

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे आणि आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वामुळे अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धापरीक्षा इच्छुक विद्यार्थ्यांशी 16 जानेवारीला संवाद साधणार आहेत. या आयोजनाची जय्यत तयारी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत सुरू असून या स्पर्धा परीक्षा महोत्सवमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे, आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी केली आहे.

राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सरकारी नोकरी मधील टक्का वाढावा. यासाठी मिशन सेवा हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाचे वेगवेगळ्या स्तरावरील प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजक राज्याचे, वित्त नियोजन व वन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते मिशन सेवा स्पर्धा महोत्सवाचे उद्घाटन 16 तारखेला होणार आहे. सोळा तारखेला विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. दिवसभराच्या या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. दिवसभराच्या या कार्यक्रमामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी, ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत असणारी संधी, केंद्रीय लोकसेवा आयोगाची आव्हाने, भारतीय प्रशासकीय सेवेचा प्रवास मिशन सेवा बद्दलची माहिती, तसेच विविध वक्त्यांकडून प्रेरणादायी मार्गदर्शनाची सत्रे दिवसभर विद्यार्थ्यांना ऐकायला मिळणार आहे. सध्या चांदा क्लब वर ज्या ठिकाणी कृषी प्रदर्शन सुरू आहे त्याच ठिकाणी 16 तारखेला एका भव्य शामियानामध्ये हा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.
मिशन सेवा अंतर्गत सध्या जिल्ह्यामध्ये दर रविवारी सराव पूर्व परीक्षा घेतली जाते. यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्या जाते. हजारो विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतात. यापूर्वी युथ एम्पावरमेंट समिट घेतले होते. त्यामध्ये 38 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले. यापैकी पाच हजार विद्यार्थ्यांना 52 कंपन्यांनी आपापल्या आस्थापनावर नोकरी दिली आहे. आदिवासीबहुल समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या या प्रतिसादाला एक सामूहिक शक्तीचे स्वरूप देण्याचे काम ना.मुनगंटीवार मिशन सेवाच्या माध्यमातून करत आहेत.

त्यामुळे दर रविवारी एमपीएससीच्या दर्जाचे पेपर सेट केले जातात. त्याची तपासणी तटस्थपणे केली जाते. विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका लक्षात आणून दिल्या जातात. तर गुणवान विद्यार्थ्यांना पुस्तकांचे सेट भेट दिले जातात. यामुळे जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षांचे वातावरण तयार झाले आहे. या विद्यार्थ्यांसाठी भारतातले मोटिवेशन टॉक देणारे मातब्बर वक्ते चंद्रपूर मध्ये आपला वेळ देत आहेत. चांदा क्लब वरील 16 जानेवारीला मोफत प्रवेश असून सर्व शाळा, कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ,तसेच जिल्ह्यातील सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.