43 नक्षलवादी व समर्थकांना अटक, 19 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पणनागपूर, ता. 8 - गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपृष्ठात आणण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना यंदाच्या वर्षात अभुतपुर्व यश प्राप्त झाले. नुकत्याच संपलेल्या 2018 या वर्षात पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीच्या बळावर वर्षभरात 50 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. तर 43 नक्षलवादी व समर्थकांना अटक करण्यात आली आहे. तसेच 19 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असून यंदाच्या वर्षात पोलीसच नक्षलवाद्यांवर वरचढ ठरले आहेत.

देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठे आव्हान असलेली नक्षल चळवळ महाराष्ट्रात 1980 च्या दशकात सुरू झाली. तत्कालीन आंध्रप्रदेश (सध्याचा तेलंगणा) मधून या चळवळीने तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याचा भाग असलेल्या सिरोंचा या भागात सर्वप्रथम प्रवेश केला. सुरुवातीला राज्याच्या गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ आणि नांदेड या सहा जिल्ह्यात कार्यरत असलेला नक्षलवाद हा आता केवळ गडचिरोली जिल्हा तसेच गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यापुरताच मर्यादीत राहिला आहे. नक्षलग्रस्त भागासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येणा-या लोककल्याणकारी व विकासाच्या विविध योजनांमुळे तसेच पोलिसांचा दुर्गम भागातील ग्रामस्थांशी वाढलेला जनसंपर्क व संवादामुळे शासनाच्या विकासाला जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळू लागला आहे. पोलिसांच्या यशस्वी विशेष रणनितीमुळे 2018 या वर्षात नक्षली चळवळीला मोठ्या प्रमाणावर हादरा बसून नक्षल चळवळीची प्रचंड मोठी हानी झाली आहे. नक्षल्यांबरोबरीच्या लढाईत पोलिसांनी उत्तम कामगिरी राहिली.

2018 या वर्षात एकूण 50 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले. यंदाच्या वर्षात केवळ एका महिण्यात 44 नक्षलवादी, तर एकाच चकमकीमध्ये एकूण 40 नक्षलवादी ठार करण्यात फार मोठे यश प्राप्त झाले. पोलिसांनी 43 नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक करण्यातही यश मिळविले असून 19 नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारला. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा फटका बसला. 80 गावांनी गावबंदी ठराव करून नक्षल्यांना गावाबाहेरच रोखल्यामुळे नक्षल्यांचा जनाधार ओसरला. या वर्षात मोठ्या प्रमाणावर नक्षली मारले गेल्यामुळे नक्षल्यांचे संख्याबळही कमी झाले आहे. एकीकडे शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन अनेक नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करीत असल्यामुळे नक्षल्यांना त्यांचे उर्वरीत संख्याबळही टिकवून ठेवणे कठीण झाले आहे. नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील स्थानिक जनतेने नक्षल्यांना गावबंदी करून शासनाच्या विकासाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे नक्षल भरतीसाठी तरूण मिळत नसल्याने नक्षल्यांची चळवळ कमकुवत झाली आहे. स्वतःचे अस्तित्व संपण्याच्या भितीमुळेच नक्षली सध्या भ्याड हल्ला करून निरापराध सामान्य नागरीकांचे बळी घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये स्थानिक गावक-यांनी नक्षली बॅनर, नक्षल नेत्यांचे पुतळे जाळल्याने, तसेच नक्षल स्मारक तोडल्यामुळे उरलेला जनाधारही नक्षल्यांचा कमी झालेला आहे. त्यातच पोलिसांनी चहुबाजुने केलेल्या नाकेबंदीमुळे नक्षलवादी सध्या बॅकफुटवर येऊन हतबल झालेले आहेत.
गडचिरोली पोलीस दलातील शूर जवानांचे अभुतपुर्व यश -
शरद शेलार, विशेष पोलिस महानिरीक्षक, नविअ, म.रा. नागपूर

हिंसेचे समर्थन करणा-या नक्षलवाद्यांना प्रतिउत्तर देऊन गडचिरोली पोलीस दलातील शूर जवानांनी सरलेल्या वर्षात अभुतपुर्व असे यश प्राप्त केले आहे. या हिंसक प्रवाहात भरकटलेल्या नक्षलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू असून नुकतेच शरण आलेले सात जहाल नक्षलवादी, हे त्याचीच परिणिती आहे, अशी प्रतिक्रिया नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख तथा विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी दिली.