बुटीबोरीसाठी नवीन वीज आराखडा तयार करा- प्रा. देशमुख

नागपूर/प्रतिनिधी:

बुटीबोरी परिसरात येणारे नवीन उद्योग आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या परिसरासाठी विजेची वाढत्या मागणीनुसार नवीन विजेचा आराखडा तयार करण्याची सूचना नागपूर जिल्हास्तरीय विदुयत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख यांनी केली आहे.

प्रा. गिरीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बुटीबोरी येथील महावितरण कार्यालयात हिंगणा तालुका विदुयत नियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर मेघे होते. बुटीबोरी परिसराचा विकास वेगाने होत असून याठिकाणी दर्जेदार आणि शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी नवीन आराखडा करणे गरजेचे आहे. असे यावेळी प्रा. देशमुख यांनी सांगितले. यावेळी वीज अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारसास नुकसान भरपाई म्हणून श्रीमती नितु भगत यांना ३ लाख ८० हजार रुपये देण्यात आले. यावेळी बुटीबोरी परिसरात मागील ५ वर्षात महावितरण मार्फत करण्यात आलेल्या कामाची माहिती देण्यात आली. यात बुटीबोरी विभागात पायाभूत आराखडा -२ योजनेत ३ नवीन नवीन उपकेंद्राची उभारणी आणि २ उपकेंद्राची क्षमता वाढ यांचा समावेश आहे. सोबतच दीनदयाल ग्राम ज्योती योजनेत ३ उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून २ उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी जिल्हास्तरीय विदुयत नियंत्रण समितीचे अध्यक्ष आणि आमदार मेघे यांना देण्यात आली.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी शाखा कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच जवाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश यावेळी प्रा. देशमुख यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी सौर कृषी पम्पाचे प्रात्यक्षिक करून दाखवावे अशी सूचना आमदार समीर मेघे यांनी यावेळी महावितरण अधिकारी वर्गाला केली. बैठकीला हिंगणा तालुका विदुयत नियंत्रण समितीचे सदस्य चंद्रशेखर पिसे, रवींद्र वानखेडे, सूचित चिमोटे,विकास दाभेकर, संजय दोडरे, प्रकाश वानखेडे, अधीक्षक अभियंता मनीष वाठ , कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ बुटीबोरी विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि शाखा अभियंता उपस्थित होते.