आव्हाने स्वीकारल्यामुळे महिलांना पुरूषी प्रवृत्तीचा त्रास:सरिता कौशिक

महिला उद्योजिका मेळावा:दीपाली साठेंच्या संगीत रजनीने रंगला दुसरा दिवस
नागपूर/प्रतिनिधी:

आज महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत बोलले जाते परंतु महिला सक्षमीकरणात आजही अडचणी आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आव्हाने स्वीकारली आहेत. याचाच त्रास पुरूषी प्रवृत्तीला होत असल्यामुळे आजही महिलांवर दबाव येत असतो. याच पुरूषी प्रवृत्तीचा महिलांना त्रास होत असल्याचे प्रतिपादन पत्रकार सरिता कौशिक यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती व समाज कल्याण विभागाच्या वतीने शहर समृध्दी उत्सवांतर्गत आयोजित ‘महिला उद्योजिका मेळाव्याच्या’ दुसऱ्या दिवसाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, आयबीएन लोकमतचे प्रवीण मुधोळकर, राजेश्वर मिश्रा, टाईम्स ऑफ इंडियाच्या बरखा माथुर, दैनिक भास्करच्या दिप्ती मुळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, समितीच्या सदस्या दिव्या धुरडे, रश्मी धुर्वे उपस्थित होत्या. 
पुढे बोलताना सरिता कौशिक म्हणाल्या, महिलांना जरी त्रास होत असला तरी प्रत्येक आव्हाने त्या लिलया पेलत आहेत. प्रत्येक क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. नागपूर महानगरपालिकेने महिला उद्योजिका मेळावा आयोजित करून आव्हाने स्वीकारणाऱ्या अशा महिलांना बळ दिले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सबल होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र म्हणाले, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचा हा उपक्रम अभिनंदनीय आहे. नागपूर शहराची बहुतांश क्षेत्राची धुरा महिलांच्या हाती आहे. महिला सक्षमीकरणासाठी नागपूर देशात एक आदर्श उदाहरण ठरेल, असे त्यांनी सांगितले. 
तत्पुर्वी महिला सक्षमीकरणाची मशाल पेटवून मान्यवरांनी मेळाव्याच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रास्ताविकातून महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या दिव्या धुरडे यांनी उद्योजिका मेळाव्याची भूमिका विषद केली. संचालन स्मिता खनगई यांनी केले. आभार ज्योत्स्ना देशमुख यांनी मानले. 

स्त्री कर्तृत्वाचा सन्मान

महिला उद्योजिका मेळाव्याच्या निमित्ताने दुसऱ्या दिवशीही स्त्री कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. योग शिक्षक असलेले दाम्पत्य हरीभा‌ऊ आणि सुषमा क्षीरसागर, स्वाध्याय शिबिराच्या माध्यमातून ताण तणाव मुक्तीवर व्याख्यान देणाऱ्या तृप्ती नेरकर, पत्रकार रेवती जोशी-अंधारे, सामाजिक कार्यकर्त्या नाहीद फाजील, व्यावसायिक छायाचित्रकार संगीता महाजन, उद्योजिका विनी मेश्राम यांचा सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

लोकशाही पंधरवाडा जनजागरण

राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने २५ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान लोकशाही पंधरवाड्याचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्त व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आज मेळाव्याच्या ठिकाणी सोडण्यात आलेल्या ‘बलून’वर मतदार नोंदणीचा संदेश देण्यात आला. ‘उठ मतदारा जागा हो, मतदानाचा धागा हो!’ यासोबतच ‘मतदार नोंदणी करा, लोकशाही बळकट करा’ असा संदेश देण्यात आला. मतदार नोंदणीबाबत जनजागृती करणारे फलकही मेळावा परिसरात लावण्यात आले आहे. 

दीपाली साठेंच्या गाण्यांवर रसिकही थिरकले
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीत आज (ता. ७) बॉलिवुडमधील ‘प्ले-बॅक सिंगर’ दीपाली साठे यांच्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. साठच्या दशकापासून अगदी आतापर्यंतच्या गाजलेल्या गीतांची मैफल दीपाली साठेंनी रंगविली. गायक आणि श्रोते यांच्यातही जुगलबंदी रंगली. दीपाली साठेंच्या ‘परफॉर्मन्स’ला यात्रा बॅण्डने सोबत दिली.