चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र;३५ व्या वर्धापन दिनाचा शानदार समारोप

लहान मुला-मुलींचे बहारदार नृत्य 
चंद्रपूरचा इतिहास व व्यसनाचे प्रतिकूल परिणाम नृत्यातून 
नृत्य व नाटिकेतून ज्वलंत सामाजिक विषयाची अचूक पेरणी 
सुमधुर मराठी-हिंदी गाणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:

 चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला जयंत बोबडे यांच्या रूपाने एक सक्षम नेतृत्व मुख्य अभियंता म्हणून लाभले असून येथील अधिकारी-कर्मचार्यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागली आहे. नुकतेच २६६० मेगावाट इतके महत्तम योगदान देत असलेल्या या वीज केंद्राचा सन्मान राष्ट्रीय पातळीवर झाला आहे हे त्याचे फलित असल्याचे मत महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे यांनी मांडले. ते चंद्रपूर वीज केंद्राच्या ३५ व्या वर्धापन दिनी समारोपीय समारंभात खुले रंगमंच ऊर्जानगर येथे बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे, मुख्य अतिथी महानिर्मितीचे कार्यकारी संचालक सतीश चवरे, नितीन चांदूरकर, विशेष अतिथी म्हणून मुख्य अभियंते अभय हरणे व राजू घुगे, मुख्य महाव्यवस्थापक डॉ.नितीन वाघ, वर्धापन दिन समिती सचिव पुरुषोत्तम उपासे, सहसचिव दिलीप मोहोड प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. 

चंद्रपूर वीज केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंगी उत्तमोत्तम कला गुण आहेत त्यांच्या कलेला राज्यस्तरीय मंच उपलब्ध द्यायला हवे असे मत नितीन चांदुरकर यांनी मांडले तर चंद्रपूर वीज केंद्रात अनेक वर्षे काम केल्याने वर्धापन दिवसाला नियमित येतो व आपल्या कुटुंबात आल्याचे समाधान व आनंद मिळत असल्याचे सतीश चवरे यांनी सांगितले. 

राजू घुगे व डॉ. नितीन वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र हे वीज उत्पादनात तसेच विविध क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे वीज केंद्र आहे आणि विविध पातळ्यांवर ह्या वीज केंद्राचा प्रगतीपर आलेख महानिर्मितीत प्रकर्षाने दिसून येतो. अभय हरणे म्हणाले कि चंद्रपूर वीज केंद्रात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची विशिष्ठ कार्यशैली, समर्पित भावना असल्याने वसाहत परिसर व वीज केंद्राने स्वत:चे एक स्टँडर्ड निर्माण केले असल्याचे गौरवोद्गार काढले. 

अध्यक्षीय भाषणातून जयंत बोबडे म्हणाले कि राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्कार व महत्तम वीज उत्पादन हे केवळ येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे व मुख्यालयातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात आजतागायत १२२०० दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली असून ३१ मार्च २०१९ पर्यंत १६५०० दशलक्ष युनिट पेक्षा अधिक वीज निर्मिती करण्याचा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रारंभी सुनील इंगळे व चमूने सुमधुर स्वागतगीत सादर केले त्यानंतर मान्यवरांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. प्रास्ताविकातून पुरुषोत्तम उपासे यांनी ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा आढावा सांगितला. समारंभाचे सूत्रसंचालन आनंद वाघमारे यांनी तर उपस्थितांचे आभार संयुक्त सचिव दिलीप मोहोड यांनी मानले.

३५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्तुत्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात प्रामुख्याने चित्रकला, हस्तकला प्रदर्शनी,रांगोळी, थाळी सजावट, सुदृढ बालक, नेत्र तपासणी शिबीर, मोतीबिंदू तपासणी, फॅशन शो, वेशभूषा स्पर्धा, आनंद मेळावा, हौजी, मॅरेथॉन, हाऊस कीपिंग,सुरक्षितता,पथनाट्य, कॅरम, बुद्धिबळ,टेबलटेनिस,बॅडमिंटन,फुटबॉल,स्केटिंग,लॉनटेनिस,व्हॉलीबॉल,बास्केटबॉल,कबड्डी,क्रिकेट, सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रमांचा सहभाग होता. 

विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली व त्यानंतर एकाहून एक सरस अशी सुमधुर गाणी, बहारदार नृत्य, नाटिका कर्मचारी कलावंत व विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. 

कार्यक्रमाला उप मुख्य अभियंते अनिल आष्टीकर, मधुकर परचाके, राजेश राजगडकर,राजेशकुमार ओसवाल, विजया बोरकर, अधीक्षक अभियंते प्रफुल्ल कुटेमाटे,सुनील कुळकर्णी, मारुती महावादी,अनिल पुनसे, अनिल गंधे,राजू सोमकुवर, पुरुषोत्तम उपासे, दत्तात्रय सुरजुसे, सुहास जाधव, चंद्रदीप डांगे, विजय उमरे,सुनील गजभिये, नितीन घुले उप महाव्यवस्थापक(मासं), सहाय्यक महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) संदेश मोरे, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.संगीता बोदलकर, सहायक महाव्यस्थापक (मासं) नंदकिशोर चन्ने, नवीनकुमार सतीवाले वरिष्ठ व्यवस्थापक(सुरक्षा), तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटदार, कंत्राटी कामगार, संघटना प्रतिनिधी, ऊर्जानगरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिन समिती पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कडाक्याच्या थंडीत देखील प्रेक्षकांची भरगच्च उपस्थिती होती हे विशेष.