मल्टीच्या मुजोरगिरीने त्रासून राजेश बेले बसणार बेमुदत उपोषणाला

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर MIDC मधील मल्टी ऑरगॅनिक्स कंपनी द्वारे दाताडा नाला व वन जमिनीवर टाकण्यात येत असलेल्या रासायनिक द्रव्यामुळे परिसरातील सहा गावातील भूजल साठा प्रदूषित झाला आहे. या रासायनिक द्रव्यांमुळे नदीचे पाणी दूषित झाले असून याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पोलीस विभाग व वन विभागाकडे तक्रार करूनही कार्यवाही होत नाही.परिणामी येत्या मंगळवार दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी शनिवारी चंद्रपूर येथे वरोरा नाकास्थित पत्रकार संघात पत्र परिषद घेऊन ही माहिती दिली.

उपोषणादरम्यान मल्टी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात यावे. लहुजी नगर येथे पाईपलाईन टाकून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्यांच्या संपत्तीची चौकशी करून निलंबित करावे. जिल्‍हाधिकारी यांनी सदर कंपनीविरुद्ध प्रदूषणावर उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करावी सुरेश चोपणे यांचे केंद्रीय पर्यावरण समिती व समितीचे सदस्य करावे प्रदूषणाची तपासणी करण्यासाठी पर्यावरण तज्ञांची समिती गठीत करावी.तसेच सदर कंपनीचे पर्यावरण संबंधीचे चौकशी करण्यात यावी. या मागण्या लावून धरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी पत्र परिषदेत दिली.यावेळी पत्रपरिषद शैलेश जुमळे,नितीन पिंपळशेंडे,सागर जोगी, उपस्थित होते.