पोंभुर्णा येथे पत्रकार भवन व मुख्‍याधिकारी निवासस्पा याभरणी समारंभ


पोंभुर्णा/अमोल जगताप:
अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा येथे बांधण्‍यात येणा-या पत्रकार भवन तसेच मुख्‍याधिकारी यांच्‍या निवासस्‍थानाच्‍या बांधकामाचा पायाभरणी सोहळा जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या हस्‍ते दिनांक 15 जानेवारी रोजी पार पडला.

यावेळी पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, पंचायत समितीचे उपसभापती विनोद देशमुख, नगराध्‍यक्ष श्‍वेता बनकर, उपाध्‍यक्षा रजिया कुरेशी, ईश्‍वर नैताम, पुष्‍पा बुरांडे, शारदा कोडापे, सौ. मॅकलवार, मोहन चलाख, मुख्‍याधिकारी विपीन मुद्दा, पत्रकार आतिक कुरैशी, आशिष कावटवार, दिलीप मॅकलवार, निलंकठ ठाकरे, जवाहर धोडरे, विराज मुरकुटे, सुरज गोरंतवार, विजय वाटेकर, विनय लोडगे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष देवराव भोंगळे म्‍हणाले, पोंभुर्णा नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी कायमस्‍वरूपी पोंभुर्णा येथे राहावे अशी नागरिकांची मागणी होती तसेच पत्रकार भवनाच्‍या बांधकामाची सुध्‍दा पत्रकार बांधवांची मागणी होती. नागरिकांनी विकासासंबंधी मागणी करायची व ना. मुनगंटीवार यांनी ती प्राधान्‍याने पुर्ण करायची असे समीकरण या मतदार संघातच नव्‍हे तर राज्‍यभर निर्माण झाले आहे. दिलेला शब्‍द पूर्ण करणारा नेता त्‍यांच्‍या रूपाने आपल्‍याला लाभला आहे हे आपले भाग्‍य असल्‍याचे देवराव भोंगळे यावेळी बोलताना म्‍हणाले.

पत्रकार भवनाच्‍या बांधकामासाठी राज्‍यसभा सदस्‍य खासदार नारायण राणे यांच्‍या स्‍थानिक विकास निधीतुन 25 लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आला असून त्‍यांचेही यावेळी बोलताना देवराव भोंगळे यांनी आभार व्‍यक्‍त केले. दोन्‍ही कार्यक्रमांना नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.