पंधरा दिवसानतंर टँकरने पाणी पुरवठा 
स्थानीक नगरसेवकांचे दुर्लक्ष , नागरीकांचा आरोप 
वाडी(नागपूर )/अरूण कराळे:


येथील डॉ .आंबेडकर नगर मध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली असून पंधरा दिवसानतंर टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे . पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शेकडो महीला व पुरुषांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस यांच्या नेतृत्वात बुधवार २८ नोव्हेंबर रोजी वाडी नगर परिषद वर हल्लाबोल केला होता .वाडी नगरपरिषद क्षेत्रातील डॉ .आंबेडकर नगर मध्ये सामान्य व गोरगरीब कुटूंब राहत असून बहुतेकांचा व्यवसाय,मजुरी खाजगी काम करणे आहे.
१५ दिवसांपासून या परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. स्थानीक नगरसेवक या गंभीर विषयाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप किशोर नागपूरकर यांनी केला आहे . त्यांनी सांगीतले की दोन दिवसापासून डॉ .आंबेडकर नगरमधील पाणी टंचाई बद्दल मुख्याधिकारी , नगराध्यक्ष , नगरसेवक यांना सांगीतले तरीही त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही .डॉ .आंबेडकर मधील रस्ते अतिशय छोटे असल्यामुळे पाण्याचा टॅकर प्रत्येक चौकात जात नाही त्यामुळे रस्त्यावरील मोठ्या चौकात टॅकर उभा करून पाणी वाटप करीत आहे.

 त्यामुळे येथे पाईपलाईननी पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरीकांची आहे . कामधंदे सोडून पाण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागत आहे.पंधरा दिवसापासून पाण्याची टंचाई असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाडी नगर परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या विरोधात असंतोष पसरलेला दिसून येत आहे