व्वो काट……….. जरा जपून!

नागपूर/प्रतिनिधी:

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगबिरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये याकरिता महावितरणने सर्व संक्रांतप्रेमींना पतंग उडवितांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

पतंग उडविण्याचा मोह लहानापासून तर मोठयापर्यत सर्वांनाच होतो व हा मोह त्यांना टाळताही येत नाही मात्र शहरी भागात वीज वितरणाच्या लघु व उच्च दाबाच्या वाहीन्यांचे जाळे पसरलेले असते आणि अनेकदा पतंग उडवितांना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंचा खांबांवर अडकतात, अश्यावेळी तो अडकलेला पतंग काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात. अश्याप्रसंगी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता असल्याने अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न जीवावर बेतू शकतो. त्यामुळे तारांत अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

बरेचदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही वीजेचा भिषण अपघात होण्याची दाट शक्यता असते. मांजा ओढतांना एका तारेवर दुस¬या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्कीट होण्याची, प्रसंगी प्राणांकीत अपघात होण्याची तसेच वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकारही घडू शकतो. सद्या बाजारात धातूमिश्रित मांजा मोठ्या प्रमाणात विक्रीसरिता उपलब्ध आहे, हा मांजा वीजप्रवाहीत तारांच्या किंवा रोहीत्र वा वीज वितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहीत होऊन प्राणांकीत अपघाताची शक्यता आहे. संक्रांत हा आनंदाचा उत्सव असून या उत्सवाला गालबोट लागू नये याकरिता पतंग उडवितांना पुरेपूर सावधानता बाळगावी असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

मांजा-वीज वाहिनीच्या घर्षणाने अनेक घरांतील साहित्य खाक - मागिल वर्षी आठवा मैल परिसरातील एका घरावर पतंग उडविताना वीज वहिनीला स्पर्श झाल्याने झालेल्या दुर्घटनेत पतंग उडविणारा मुलगा भाजला तसेच विद्युत दाब अचानक वाढल्याने ६ घरातील उपकरणे व साहित्य जळाले. दवलामेटी हिलटॉप परिसरातील बाबाराव मलीये यांचा १३ वर्षिय नातू कार्तिक बढिये घरावर पतंग उडवीत होता, याच घरावरून उच्च दाबाची विद्युत वहिनी आहे. अचानक गणेशची पतंग या तारात अटकल्याने ती सोडविण्यासाठी त्याने ओढाताण सुरू केल्याने तारेचा परस्परांना स्पर्श झाला. त्यामुळे विधुत प्रवाह उलट दिशेने तारातून घरातील मीटरमध्ये गेल्याने मीटर सोबतच घरातील टीव्हीचा स्फोट झाला. तसेच गादी व मोबाईल जळाला, तर याच विद्युत स्फोटात गच्चीवर पतंग उडवीत असलेला गणेश हा 40 टक्के भाजला. सोबतच परिसरातील अनेकांची विद्युत मीटर व उपकरणे जळाली. 

दुर्दैवी मृत्यू - यापुर्वीही मिरे लेआऊट येथे देवांशू विजय अहेर या ९ वर्षीय बालकाचा मृत्यू पतंग उडवितांना घराच्या गच्चीजवळील उच्च दाबाच्या वीज तारांना स्पर्शाने झाला होता, तर दुस-या एक घटनेत खामला येथील राजेश पुरण पटेल या १८ वर्षीय तरूणाचा वीज तारांना अडकलेला पतंग काढ़ण्याच्या नादात मृत्यू झाला होता, या व अश्या घटना दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असतात, अश्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी योग्य ती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

हे लक्षात ठेवा
• वीज तारांवार अडकलेला पतंग काढणे जीवघेणा ठरू शकतो.
• तारामध्ये अडकलेला मांजा ओढू नये. 
• अडकलेला पतंग किंवा मांजा काढायला रोहीत्रावर चढू नये.
• धातूमिश्रीत अथवा नॉयलॉनचा मांजा टाळावा.
• वीज तारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा..
• तारांत अडकलेला पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.
• पतंग उडविणा¬या पाल्यांकडे पालकांनी लक्ष दयावे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
प्रादेशिक कार्यालय, महावितरण, नागपूर