7 व्या व्यसनमुक्ती संमेलनाचा चंद्रपूरमध्ये थाटात समारोप


उपचाराच्या चौकटीतून बाहेर निघून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे आवश्यक : डॉ.बंग
चंद्रपूर, दि.3 फेब्रुवारी - राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनामुळे एक सकारात्मक उर्जा निर्माण केला असून, ही ऊर्जा व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. येथे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या ज्या सामाजिक कार्यकर्त्याना पुरस्कार मिळाला त्या सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे. यापुढेही जबाबदारीने त्यांनी व्यसनमुक्तीसाठी काम करावे. व्यसनमुक्तीसाठी केवळ उपचार या चौकटीत न राहता या चौकटीबाहेर निघून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले. चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंडवर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आणि महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमाची सांगता आज रविवारी झाली. यावेळी समारोपीय कार्यक्रमात डॉ. बंग बोलत होते.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.राजकुमार बडोले, संमेलनाध्यक्ष डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, शारदा बडोले, आमदार नानाजी श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड, कीर्तनकार तुषार सूर्यवंशी, नशाबंदी मंडळाच्या वर्षा विलास, समाज कल्याणचे अतिरिक्त आयुक्त खंडाते, चंद्रपूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी आदी उपस्थित होते.
 डॉ. बंग म्हणाले, व्यसनमुक्तीसाठी राज्यसरकारला जी मदत करता येईल, ती यापुढेही आपण करणार असून, व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी नेहमीच सरकारसोबत राहू, अशी ग्वाही डॉ. बंग यांनी दिली.

आजचे आकर्षण ठरलेले ‘व्यसनमुक्ती’ प्रसार माध्यमे आणि साहित्यिकांची जबाबदारी या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले नागपूर येथून प्रकाशित होणारे दैनिक सकाळचे संपादक शैलेश पांडे, दैनिक तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव, दै.लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गांवडे, दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, सुप्रसिध्द सिनेअभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड, नितीन कुळकर्णी यांनी दारुमुक्ती हाच पर्याय पुढे असल्याचा सुर या वक्त्यांनी व्यक्त केला. प्राथमिक शिक्षणापासून याबाबतच्या जागृतीला प्रारंभ व्हावा, अनेक वेळा दारुबंदी हा उपाय ठरू शकत नाही. दारुमुक्तीलाच प्राधान्य देणे योग्य ठरेल असा सुर व्यक्त केला.

सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी व्यसनमुक्त महाराष्ट्र निर्माण करणे काळाची गरज असून, यासाठी आपणा सर्वांना पुढे येऊन एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी यांनी केले.

याप्रसंगी निवडणुका दारूमुक्त करणे, दारूबंदीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे, गावपातळीवर सामूहिक व्यसनमुक्त गट निर्माण करणे, मतदान केंद्रांवर ब्रिथलायझर मशीन उपलब्ध करून देणे आदी महत्त्वाचे तेरा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आले. यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे, डॉ. निशीगंधा वाड, तुषार सूर्यवंशी यांनीही मार्गदर्शन केले.

आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री निशींगंधा वाड, समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तुषार सुर्यवंशी यांना दुसरा संत चोखा मेळावा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. तर या सन 2018-19 मधील महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्ती व संस्थांचाही मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला

पुरस्कार विजेत्यांची नांवे

सन 2018-19 मध्ये पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नावे – विजयकांत मंगेश सागर वसई जि.पालघर, अशोक जयवंत गजभिये खडकपाडा, माया हनुमंत मोरे सानपाडा, डॉ.जित बळवंत मगदूम बेलापूर ठाणे, अर्पिता राजेंद्र मुंबरकर विद्यानगर जि.सिंधुदूर्ग, शाहीर रामचंद्र नायकू जाधव मिरज व डॉ.बाळासो निवृत्ती कर्पे विटा जि.सागली, शाहीर शहाबुद्दीन कादर शेख नागठाणे जि.सातारा, ज्योती विजय देशमुख लखमापूर जि.नाशिक, शाहीर बलभीम महादू शिंदे टाकळी ढोकेश्वर व डॉ.रंजना पगार गवांदे संग्राम जि.अहमदनगर, संदीपपाल गजानन गिते महेशनगर व श्रीकृष्ण पखाले गुरुकुंज जि.अमरावती, समीर खंडू जाधव कामशेत, प्रकाश केशव वायंगणकर व नितीन अच्युत देऊस्कर मुक्तांगण विश्रांतवाडी आणि राजेंद्र दत्तात्रय कदम राजेगाव जि.पुणे, एकनाथ चंदर कुंभार सडोली जि.कोल्हापूर, श्रीमती माया धांडे व सुभाष गुलाबराव सवडतकर जि.बुलढाणा, गुरुनाथ रामचंद्र पेंढारकर तांदळी, अमरजितसिंग पी संतबाबा नगिनाघाट रोड, डॉ.चंदा जयराम बहरेवाडा व प्रा.दीपक बाबूराव पानसकर जि.नांदेड, सुरेंद्रकुमार रावजी ठाकरे बोंडगाव देवी जि.गोंदिया, बंडूपंत राजेश्वर बोढेकर मु.जि.गडचिरोली, श्री.विनोद मेश्राम जि.चंद्रपूर, राजेंद्र समाधान भटकर मुरंबा जि.अकोला, पंकज खंडूसिंग राठोड रुई, संजय मधुकर कडोळ कारंजा व ह.भ.प.श्रीकृष्ण बाबाराव राऊत वाशिम जि.वाशिम, सुनील जगन गुजर आमरखेडा, ह.भ.प.नवनाथ विनायकराव आंधळे शिवनेरी कॉलनी व शाहीर सुरेश जाधव जि.औरंगाबाद, लालासाहेब राजेसाहेब देशमुख शिलानगर जि.लातूर, बाबुराव धोंडिया जोगदंड पांगरा जि.हिंगोली, डॉ.रमेश शिंदे परभणी व नितीन सोमनाथ विसपुते चेतना व्यसनमुक्ती केंद्र जळगाव यांना देण्यात आला आहे.

तर सन 2018-19 मध्ये पुरस्कार देण्यात आलेल्या संस्थांची नावे- वर्ल्ड रिन्यूअल स्पिरीच्युअल ट्रस्ट कल्याण जि.ठाणे, संकल्प बहुद्देशीय युवा संस्था राजुरी व नवजीवन प्रतिष्ठान निगंडी जि.पुणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ गुरुदेवनगर जि.अमरावती, कै.सोपानराव तांदळापूर क्रीडा मंडळ व व्यायामशाळा कुंचेली जि.नांदेड, प.पूज्य श्री शेषरावजी महाराज व्यवसनमुक्ती संघटना चंद्रपूर, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूर, सहारा व्यसनमुक्ती केंद्र बीड बायपास जि.औरंगाबाद, गुरुदेव शिक्षण संस्था कुरखेडा जि.गडचिरोली व श्री विलासराव हावळे बहुद्देशीय सामाजिक संस्था भंडीशेगाव जि.सोलापूर या संस्थांना वितरीत करण्यात आला आहे.