अखेर तोडगा निघाला! काय म्हणाले वडेट्टीवार





अखेर तोडगा निघाला! काय म्हणाले वडेट्टीवार

पक्षासाठी दोन पावले मागे घेतली,काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या बैठकीनंतर चंद्रपूर काँग्रेसमध्ये तोडगा निघाला*
*काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट*

गटनेता पदाचे नाव प्रदेशाध्यक्ष ठरवणार, महापौर खासदार धानोरकर आणि स्टँडिग कमिटी बाबत विधिमंडळ नेते वडेट्टीवार निर्णय घेणार

दिनचर्या न्युज :-
नागपूर, दि.२४ – चंद्रपूर महापालिकेबाबत काँग्रेस मध्ये घडलेल्या गोंधळ नंतर पक्षश्रेष्ठींची तातडीची बैठक झाली. या बैठकीनंतर तोडगा निघाला असून गटनेता हा प्रदेशाध्यक्ष ठरवणार असून महापौर खासदार प्रतिभा धानोरकर आणि स्टँडिग कमिटीबाबत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार निर्णय घेणार असल्याचा निर्णय झाला आहे.

चंद्रपुरातील काँग्रेस नगरसेवकांचा गट स्थापन करण्याच्या हालचालीनंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. याबाबत महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथलाजी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रपूरच्या परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. चंद्रपूर महापालिकेत महापौर पदाची जबाबदारी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली असून चंद्रपुरात जे समर्थन देतील त्यांना उपमहापौर देण्याबाबत निर्णय झाला आहे.

गेली पंचवीस वर्ष काँग्रेस पक्षासाठी काम करत असताना पक्षासाठी जे योग्य तो निर्णय घेणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. पक्षाचा नेता म्हणून संयमी भूमिका घ्यावी लागते,कोणी टीका केली, शिव्या दिल्या तरी आपले काम करावे लागते.यावेळी देखील पक्षासाठी दोन पावले मागे घेतल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांना उत्तर देताना स्पष्ट केले.

चंद्रपुरात उद्भवलेल्या स्थितीत भाजपने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या असून नगरसेवकांना विविध प्रलोभने दिली जात आहे. नगरसेवकांना एक कोटी रुपये, पद देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. काँग्रेस आणि भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी इतरांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे अशा वेळी पद आणि पैसा यामुळे जादू होणार का,अपक्ष बळी पडणार का हा प्रश्न असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

महाराष्ट्र सदन प्रकरणी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना क्लिनचीट मिळाली असून भाजपबरोबर गेल्यावर सगळ्यांवरचे आरोप धुवून निघतात. भाजपकडे पॉवरफूल मशीन असल्याने जे त्यांच्याकडे जातात ते स्वच्छ होऊन बाहेर निघतात असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. छगन भुजबळ हे अडीच वर्ष तुरुंगात गेले, त्याची भरपाई कशी होणार? ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्याचं काय असा सवाल वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला.