मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावामराठी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. सोपानदेव पिसे यांचे प्रतिपादन

तालुका वार्ताहर / कुही

मराठी ही आपली मातृभाषा, ज्ञानभाषा, राजभाषा व धर्मभाषा असल्यामुळे सुरुवातीपासूनच ती स्वतंत्र आहे. आपल्या भाषेचा इतिहास लक्षात घेता केंद्र सरकारने ठरवून दिलेले निकष पूर्ण करून सुद्धा आजही आपण अभिजात दर्जा प्राप्त करू शकलो नाही. हे अत्यंत दुदैर्वी असून, सन२0१५मध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आणि निकाल थांबला. सन१९६७ मध्ये १४भाषांना अधिकृत दर्जा होता. १५वर्षात तामिळ, संस्कृत,तेलगू, कन्नड, मलयालमव उडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून अनेक भाषा त्यासाठी रांगेत उभ्या आहेत. राजकीय पक्षांच्या भाषिक अस्मिता लक्षात घेता एकून २२भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,अशी मागणी केली जात आहे. त्यात दाक्षिणात्य भाषा यशस्वी ठरल्या आहेत.मराठी भाषा संस्कृत पेक्षा प्राचीन असल्याचे अनेक लेखकांच्या लिखानावरून लक्षात येते. मराठी भाषा प्रगल्भ असल्याची प्रचिती येते.तेव्हा मराठी भाषेला भाषेचा अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणी रा.तु.म.नागपूर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. सोपानदेव पिसे यांनी केली.
श्रीक्षेत्र अंभोरा येथे देवस्थान व्यवस्थापक मंडळाच्या वतीने रविवारी (२७ जानेवारी) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. यासाठी एकदिवसीय जागर महोत्सव कार्यक्रम अंभोरा देवस्थान येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी उद्घाटकीय भाषणात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी देवस्थान मंडळाचे सचिव केशवराव वाडीभस्मे होते. 
तर प्रमुख अतिथी प्रा. डॉ. संजय तिजारे, देवस्थान मंडळाचे कोषाध्यक्ष मदनराव खडसिंगे, सेवानवृत्त शिक्षक ईश्‍वर ढेंगे, नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप घुमडवार, जेष्ठ पत्रकार सुधीर भगत, सज्जन पाटील, कुही तालुका पत्रकार संघाचे सरचिटणीस हरिभाऊ लुटे, दिलीप चव्हाण, खुशाल लांजेवार, सुधीर पडोळे, गुरुदेव वनदुधे,भास्कर भोंगाडे आदी उपस्थित होते.
या भूमीत स्वामी मुकुंदराजांनी 'विवेकसिंधू'नावाचा पहिला ओवीबद्ध ग्रंथ सन ११८८ मध्ये लिहिला असल्यामुळे ह्या ग्रंथातील काही निवडक ओव्या युवकांच्या अभ्यासाकरीता अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यात, असा सूर उपस्थित मान्यवरांचा होता. 
तेव्हा मराठी भाषेचे अस्तित्व टिकविणे हे प्रत्येक मराठी माणसांचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. विवेकसिंधूचे महत्व जाणून रामटेक येथील कालिदास स्मारकाच्या धर्तीवर अंभोरा येथे स्वामी मुकुंदराज स्वामी यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी सुद्धा यावेळेस करण्यात आली. प्रास्ताविक कोषाध्यक्ष मदन खडसिंगे तर संचालन प्रा. सुरेश नखाते यांनी केले. तर आभार विश्‍वस्त अमृत तुमसरे यांनी मानले.