आदिवासी महोत्सवाचे उद्घाटन थाटात

नागपूर/प्रतिनिधी:

आदिवासी समाजाला पुरातन संस्कृतीसह शौर्याचा इतिहास लाभला आहे. बदलत्या युगात आदिवासी समाजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र प्रगतीचे शिखर गाठताना आपल्या पुरातन संस्कृतीचे जतन होणेही आवश्‍यक आहे. आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढ्रयांना हा इतिहास अवगत व्हावा यासाठी आदिवासी महोत्सवाद्वारे संधी उपलब्ध करण्यात आली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.   

परंपरागत आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार (ता. ८) आयोजित आदिवासी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. मंचावर महोत्सवाचे उद्घाटक राष्ट्रीय जनजाति आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार शाय, प्रमुख ‍अतिथी म्हणून आमदार सुधाकर देशमुख, महोत्सवाच्या आयोजक राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या माया इवनाते, आयोगाचे सदस्य हरीकृष्ण दामोद, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक संदीप जाधव, नगरसेविका रूतिका मसराम, गोंड राजमाता राजश्रीदेवी उईके,‍ शिवाणी दाणी, दिगंबर चौहाण, श्री. पंजवानी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आज आदिवासी समाजातील प्रतिभावंतांनी विविध क्षेत्रात लौकिक प्राप्त केले आहे. या समाजाने इतिहासात केलेल्या शौर्याची महतीही प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा महोत्सवाचे आयोजन महत्वाचे ठरते. प्रत्येक समाजबांधवाने आपली संस्कृती न विसरता या संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

राष्ट्रीय जनजाति आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार शाय म्हणाले, देशासाठी बलिदानात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. मात्र देशासाठी आपले शौर्य पणाला लावणाऱ्या या महावीरांच्या कार्याला हवा तो सन्मान मिळू शकला नाही.‍ देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना योग्य सन्मान ‍मिळावा, लुप्त पडलेल्या इतिहासाचा अध्याय पुन्हा लिहीला जावा यासाठी राष्ट्रीय जनजाति आयोगाद्वारा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या व महोत्सवाच्या आयोजक माया इवनाते यांनी केले.

नागपुर का राजा’चे सादरीकरण शनिवारी

महोत्सवाच्या समारोप प्रसंगी सायंकाळी ५.३० वाजता ‘नागपुर का राजा’ या महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी आयोजित समारोप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या माया इवनाते उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर नंदा जिचकार भूषवतील.