· एक लाख ५७ हजार मतदारांनी केले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक

  • - व्हीव्हीपॅटमुळे मतदानामध्ये अधिक पारदर्शकता  - अश्विन मुदगल
  • - उच्च न्यायालय येथे व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक


नागपूर, दि. 8 : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रासह प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून, मतदान करताना झालेल्या मतदानासंदर्भातील माहिती सात सेकंदापर्यंत प्रत्यक्ष पाहता येणार आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून, केलेले मतदान सुरक्षित असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण होणार असल्याची ग्वाही जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथील सभागृहात मतदार जागृती अभियानांतर्गंत इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटच्या वापरासंबंधीचे सादरीकरण व प्रात्यक्षिक बार असोशिएशन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी हायकोर्ट बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲङ अनिल किलोर, तसेच बार असोशिएशनच्या श्रीमती वेंकटरमन, प्रफुल्ल कुबाळकर, जयदीप चांदूरकर, मुख्य सरकारी वकील सुमंत देवपुजारी, पुरुषोत्तम पाटील तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा तसेच बार असोशिएशनचे सर्व पदाधिकारी यावेळीउपस्थित होते.

निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचा वापर प्रारंभी केरळ राज्यातील पारावूर विधानसभा मतदारसंघात करण्यात आला होता. त्याच्या उपयुक्ततेमुळे भारत निवडणूक आयोगाने ‘भेल’ व ‘इसीआयएल’ या शासनाच्या कंपन्यांमार्फत इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राच्या निर्मितीला सुरुवात केली असून, 15 मार्च 1989 पासून संपूर्ण राज्यात निवडणुकांमध्ये या यंत्रांचा वापर करण्यात येत असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की,नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात या यंत्रासोबतच प्रथमच व्हीव्हीपॅटचासुद्धा वापर करण्यात येत आहे. ही संपूर्ण यंत्रणा अत्यंत सुरक्षित असून, मतदानापूर्वी सर्व मशीनची तपासणी व मॉक पोल नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.

मतदानासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मशीन मतदानाच्या ४८ तासापूर्वी रॅडमायझेशन करुन पाठविण्यात येत असल्यामुळे मतदानकेंद्रांवर पाठवण्यात येणाऱ्या मशीनची पूर्वकल्पना कुणालाही असूच शकत नाही. तसेच प्रत्यक्ष मतदानापूर्वी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसमोर मॉक पोल घेण्यात येत असल्यामुळे आपले मतदान सुरक्षित आहे, याची ग्वाही या संपूर्ण प्रक्रियेमार्फत देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पाडल्या जाते. प्रत्यक्ष निवडणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिंग एजंट, मायक्रो ऑब्झर्व्हर, वेब कॉस्टींग, सीसीटीव्ही, सेक्टर ऑफिसर तसेच मीडियाचे प्रतिनिधी यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रियेनंतर अत्यंत सुरक्षिततेतर्गंत स्ट्राँगरुममध्ये मतमोजणीपर्यंत सर्व मशीन ठेवण्यात येतात.

यावेळी जिल्हा‍धिकारी अश्विन मुदगल यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनबाबत विविध शंका उपस्थित करण्यात येत असल्या तरी भारतीय निवडणूक आयोगाने सर्व शंकांचे समाधान केले असून, आतापर्यंत देशातील विविध उच्च न्यायालयात 37 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 30 याचिकांचा निकाल हा भारतीय निवडणूक आयोगाच्या बाजूने लागला आहे. तर 7 याचिकांवर सुनावणी सुरु आहे. इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राद्वारे होणारे मतदान अत्यंत सुरक्षित असल्यामुळेच संपूर्ण देशात ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेबद्दल संभ्रम असल्यास तात्काळ आपले मत नोंदविण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे.


गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, आणि कर्नाटक या राज्यात झालेल्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा यशस्वी वापर करण्यात आला असून, देशभरात 5हजार 626 कोटी रुपये किमतीच्या 40 लाख युनिटचा वापर करण्यात आला आहे.

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होत असल्यामुळे जनतेला मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 4 हजार 832 मतदान केंद्र असून, सर्वच मतदान केंद्रांपर्यंत जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गंत जिल्ह्यातील आतापर्यंत 1 लाख 56 हजार 696 नागरिकांनी व्हीव्हीपॅटवर प्रत्यक्ष मतदानाची माहिती घेतली आहे. ही जनजागृती मोहिमेतर्गंत चित्ररथासह विविध माध्यमांचा प्रभावी वापर सुरु असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी हायकोर्ट बार असोशिएशनच्या श्रीमती वेंकटरमन यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती दिली. तर ॲङ पुरुषोत्तम पाटील यांनी आभार मानले. इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करुन झालेल्या मतदानाची माहिती यावेळी सर्व उपस्थितांनी घेतली.