शिकवणी वर्गामुळे महाविद्यालये पडली ओस!

चंद्रपूरलाखो रुपयांचे शुल्क घेऊन शहरात सुरू असलेल्या काही खासगी शिकवणी वर्गामध्ये मूलभूत सुविधाच नसल्याचे समोर आले. मात्र, या शिकवणी वर्गामुळे महाविद्यालये ओस पडली आहेत. लाखो रुपयांचे वेतन घेणारे प्राध्यापक केवळ आता औपचारिकता म्हणून महाविद्यालयात येतात, असे विदारक चित्र निर्माण झाले आहे.
बहुतांश पालकांचा ओढ पाल्यांना डॉक्टर किंवा इंजिनिअर करण्याकडे आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर जेईई, नेट, यासारख्या परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण कराव्या लागतात. त्यासाठी विद्यार्थी शिकवणी वर्ग लावतात. मात्र, आता काही खासगी संस्थांनी स्वत:चे निवासी वर्ग करू सुरू केले. त्याठिकाणी विद्यार्थी राहतात. बारावी अभ्यासक्रम आणि त्यानंतर उपरोक्त परीक्षा यासाठी लाखो रुपये त्यांच्याकडून घेतले जातात. खासगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयातील अनुपस्थिती या पाश्‍वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न केला.
त्यासाठी महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरी सुरू केली. मात्र, यामुळे खासगी निवासी, अनिवासी शिकवणी वर्गांना कोणताही फरक पडला नाही. ज्या महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्याकडे असतात, त्या संस्थेशी ते करार करतात. एका विद्याथ्यार्मागे ठराविक रक्कम संबंधित महाविद्यालयात दिली जाते. त्याच्या बदल्यात ते विद्यार्थी निवासी म्हणून या शिकवणी वर्गाकडे पाठवितात.
बायोमेट्रिक हजेरीवरही या महाविद्यालयांनी तोडगा शोधला आहे. बायामेट्रिक यंत्रावर विद्यार्थ्यांचे अंगठे घेतले जात नाही. त्याऐवजी त्यांचे डिजिटल आयकार्ड तयार केले जातात. हेच आयकार्डच्या माध्यमातून बायोमेट्रिक हजेरी लावली जाते. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयाऐवजी खासगी शिकवणी वर्गात असतानाही महाविद्यालयाची पटसंख्या शंभर टक्के असते. यात शिकवणी विभागालाही मॅनेज केले जाते. विशेष म्हणजे, बाराव्या वर्गाच्या अभ्यासक्रमाकडे खासगी शिकवणी वर्ग लक्षच देत नाही. त्यानंतरच्या अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक परीक्षांची तयारी करून घेतात. मात्र तीही अर्धवटच असते.
भौतिक, रसायन, जीवशास्त्र आदी विषयांसाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळा असणे आवश्यक आहे. ज्या महाविद्यालयात ६0 विद्यार्थ्याचा प्रवेश असेल. त्या ठिकाणी प्रयोगशाळेत ६0 संगणक नियमानुसार आवश्यक आहे. मात्र, खासगी शिकवणी संस्थांकडे मूलभूत सोयींची वानवा असते. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच शिकवणी वर्गाला सुरुवात होते. त्यावेळी विद्यार्थ्यांचे वय जेमतेम सोळा असते.
त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही तो दुचाकीने शिकवणी वर्गाला जातो. अनेकदा असे धाडस विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतले आहे. शिकविण्यासाठी पुरेसा अनुभव वर्गसुद्धा त्यांच्याकडे नसतो. तीन-चार महिन्यांत शिकविणारे बदलत असतात. मात्र, जाहिरात आणि शिकवणी वर्गाला व कॉपरेट लुक याला पालक आणि विद्यार्थी बळी पडतात.