भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील झुंजार क्रांतिवीर हुतात्मा भाई कोतवाल
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील झुंजार क्रांतिवीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जयंतीनिमित्त.........*
भारतीय स्वातंत्र्य युद्धातील एक धकधकते व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतिवीर भाई कोतवाल.भाई कोतवाल यांचा जन्म १ डिसेंबर १९१२ रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरान येथे नाभिक समाजातील एका गरीब कुटुंबात झाला.घरची परिस्थिती गरीब त्यामुळे त्यांना त्यांचे शालेय शिक्षण खडकी येथे त्यांच्या आत्याकडे झाले.
पूर्वीच्या सातवी फायनल परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.त्यांच्या शिक्षणातील या दैदीप्यमान यशामुळे त्यांच्या आत्याच्या पतीने पुढील इंग्रजी शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊ केले.लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे भाई मेट्रिकची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.भाई कोतवालांच्या वडिलांचा व्यवसाय होता.
माथेरान सारख्या थंड हवेच्या ठिकाणी अनेक लोक पर्यटनासाठी येत.त्यानिमित्ताने भाईचे वडील लक्ष्मण कोतवाल यांचा विविध लोकांशी संपर्क येत असे.एकदा मुंबईतील वरळी कोळीवाड्यातील एक श्रीमंत सद्गृहस्थ श्री.राजाराम राऊत माथेरान मुक्कामी आले होते.त्यांना भाई कोतवालांच्या वडिलांनी आपला मुलगा मेट्रिक झाल्याचे सांगितले. मात्र राऊत यांनी भाईची अभ्यासातील प्रगती आणि हुशारी पाहून त्यांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था केली आणि त्यांच्या वकिली पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
भाईंनी आपली वकिली माथेरान कर्जत येथे सुरू केली.माथेरान ला अनेक पर्यटक येत असत,परंतु ते रिक्षाचालकास योग्य तो मोबदला देत नसत.वीर भाई कोतवाल यांनी त्या रिक्षाचालकांची संघटना बांधून त्यांना न्याय मिळवून दिला.त्यामुळे सर्व जण त्यांना भाई म्हणून संबोधू लागले आणि अश्या तर्हेने विठ्ठल लक्ष्मण कोतवाल यांचे भाई कोतवाल असे नामकरण झाले.याच दरम्यान १९४२ चा स्वतंत्र्यांचा लढा जोर धरू लागला होता .लढा अगदी अंतिम टप्प्यात आला होता अशा वेळी उच्च शिक्षित असलेला हा माथेरानचा तरुण स्वातंत्र लढ्यात ओढला गेला.त्यांची आंदोलने सुरू झाली इंग्रजांचे पोलीस भाईंना पकडण्यासाठी जात असताना त्यांनी पलायन करून भूमिगत झाले आणि भाईंचा भूमिगत लढा सुरू झाला होता.त्यांनी अनेक तरुण क्रांतिकारांची फळी निर्माण केली होती.इंग्रजांना जशास तसे म्हणजे ठोशास ठोसा या पद्धतीने त्यांनी भूमिगत राहून लढा सुरू केला.
रायगड जिल्ह्याचा उत्तर आणि ठाणे जिल्ह्याचा पूर्व भाग या परिसरात भाईंनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.इंग्रज सरकारने वीर भाई कोतवाल यांचा इतका धसका घेतला होता की,वीर भाई कोतवाल यांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने इनाम घोषित केले होते.जंगल,दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करून भाई कोतवाल इंग्रजांशी लढत होते.ते भूमिगत असताना मुरबाड तालुक्यातील सिद्धगडाच्या गुहेत राहत,त्यांना सामाजिक,विविध जातीधर्माच्या लोकांचा पाठिंबा व सहकार्य मिळत होते.शेवटी वीर भाई कोतवाल यांचा ठावठिकाणा इंग्रजांच्या पोलिसांना खबऱ्यामार्फत लागला.पोलिसांनी सिद्धगडाच्या गुहेवर हल्ला चढवला भाईंना शरण येण्यास सांगितले पण इंग्रज सरकारच्या समोर झुकले ते भाई कसले? वीर भाई कोतवाल यांनी इंग्रजाशी लढायचे ठरवले,वीर भाई कोतवाल यांना वीर हिराजी पाटील या सहकार्याची पूर्ण साथ होती.२ जानेवारी १९४३ ला इंग्रजांनी वीर भाई कोतवाल यांना घेरले परंतु वीर भाई कोतवाल आणि वीर हिराजी पाटील यांनी इंग्रजांना दाद दिली नाही दोन्ही बाजुनी गोळीबार सुरू झाला आणि इंग्रजांच्या गोळीबारामुळे वीर भाई कोतवाल आणि आणि वीर हिराजी पाटील हे  धारातीर्थी पडले.या क्रांतिकाराच्या बलिदानामुळे शेवटी इंग्रज सरकारला भारत सोडावा लागला आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र देश म्हणून घोषित करावा लागला.वीर भाई कोतवाल हे नाभिक समाजाचे भूषण आहेत,त्यांचा त्याग आणि त्यांची देशभक्ती शिवाय देशावरील प्रेम निष्ठा यामुळे नाभिक समाजाची देखील मान ही गर्वाने उंचावली आहे.
एक उच्च शिक्षित माणूस जो वकिली करून आपला उदरनिर्वाह आनंदाने करू शकले असते परंतु मुळातच असणारा बंडखोर  स्वभाव चाकोरीबद्ध जीवनात त्यांना अडकवू शकला नाही हा त्यांचा त्याग आणि स्वभावातच पुढील क्रांतीचे बीज रोवले गेले होते.रिक्षाचालकांची संघटना बांधल्यावर भाईंनी कधी मागे वळुन पाहिलेच नाही.एक कुशल संघटक म्हणून भाई प्रसिद्ध झाले होते.या संघटन कौशल्यामुळे आणि मनमिळावू स्वभावामुळे भाई भूमिगत असताना जंगलात राहणाऱ्या कातकरी,ठाकर,आगरी,महादेव कोळी या समाजातील लोकांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले.स्वातंत्र लढा हा खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे उभा राहिला त्या या क्रांतिकाराचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
क्रांतीची ज्योत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी वीर भाई कोतवालांनी अथक परिश्रम घेतले. तळागाळाच्या लोकांच्या सहकार्यामुळे भारताचा स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला आणि भारत देश स्वतंत्र झाला.वीर भाई कोतवाल यांच्या स्मृती सदैव आमच्या स्मरणात राहील अशा या थोर पुरुषास कोटी कोटी प्रणाम!! असा मोहरा झाला नाही,पुढे न होणार....भाई कोतवाल हे नाव पुढे जगात गर्जत राहणार.
     🌹