नामांकित शाळेतील प्रवेश व घरकुल बांधणी योजनेचा धनगर समाजाने लाभ घ्यावा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन





नामांकित शाळेतील प्रवेश व घरकुल बांधणी योजनेचा

धनगर समाजाने लाभ घ्यावा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

चंद्रपूर दि 17 जानेवारी : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे राहू नये, यासाठी शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी राज्य सरकारने योजना तयार केली आहे. तसेच भटक्या समाजाला स्थिरता मिळावी यासाठी ग्रामीण भागात घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या दोन्ही योजनांचा लाभ जिल्ह्यातील धनगर समाजाने घ्यावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन,इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिन विकास, तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर येथे पालकमंत्री कार्यालयाची सुरुवात केली. यावेळी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाकडून स्वागत स्वीकारतांना त्यांनी या संदर्भातील माहिती दिली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग तसेच विमुक्त जाती विभागाची देखील जबाबदारी आहे. यावेळी त्यांनी धनगर समाजाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित शिष्टमंडळाला दिली.

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये, तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे, यासाठी समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी धनगर समाजातील विद्यार्थी देखील पात्र असून विद्यार्थ्यांचे स्वतःचे जात प्रमाणपत्र, पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा एक लक्ष असेल तर त्याला याठिकाणी प्रवेश घेता येईल.

विधवा, घटस्फोटित, निराधार, परितक्त्या दारिद्र रेषेखालील कुटुंबातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी प्राधान्य असून संबंधित विद्यार्थ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार नामांकित शाळेमध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना असून महाराष्ट्रातील धनगर कुटुंबातील 15 वर्षाच्या वास्तव्य असणारे कुटुंब प्रमुख यासाठी पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. लाभार्थी निवडीचे व वैयक्तिक घरकुलाला प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या समितीला आहे. निधी वितरण ग्रामविकास विभागाच्या गृहनिर्माण कक्षामार्फत होणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.