जिल्‍हयातील प्रत्‍येक तालुका स्‍तरावर क्‍वारंटाईन सेंटर्स सुरू करावे – आ. सुधीर मुनगंटीवार

जिल्‍हयातील प्रत्‍येक तालुका स्‍तरावर क्‍वारंटाईन सेंटर्स सुरू करावे – आ. सुधीर मुनगंटीवार



जिल्‍हाधिका-यांसह झालेल्‍या बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी घेतला उपाययोजनांचा आढावा!
 
चंद्रपूर :- दिनचर्या न्युज :-
कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने चंद्रपूर जिल्‍हा प्रशासन उत्‍तमरित्‍या कार्य करीत असून प्रत्‍येक तालुका स्‍तरावर क्‍वारंटाईन सेंटर्स सुरू करण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हा प्रशासनाला केली आहे. तसेच चंद्रपूरातील हॉटेल ट्रायस्‍टार, चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील सैनिकी शाळा आणि कोर्टीमक्‍ता येथील मिलीटरी सेंटर चा उपयोग सुध्‍दा क्‍वारंटाईन सेंटर म्‍हणून करण्‍याची सूचना आ. मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना केली.
दिनांक 24 मार्च रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना संदर्भात जिल्‍हा प्रशासन करीत असलेल्‍या उपाययोजनांबाबत जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची भेट घेत त्‍यांच्‍याशी चर्चा केली. या चर्चेदरम्‍यान प्रशासनातर्फे करण्‍यात येत असलेल्‍या उपाययोजनांची विस्‍तृत माहिती जिल्‍हाधिकारी यांनी आ. मुनगंटीवार यांना दिली.
 चंद्रपूर येथे चाचणी सुविधा केंद्र उपलब्‍ध आहे. या केंद्रात रूग्‍णाचा स्‍वॅप तपासणीसाठी आणला जातो. ही प्रक्रिया अधिक सुलभ व्‍हावी यासाठी एक मोबाईल पथक तयार करून जिल्‍हयातील प्रत्‍येक ठिकाणाहून रूग्‍णाचा स्‍वॅप चंद्रपूरात आणून तो तपासणीसाठी पाठविण्‍याची सूचना आ. मुनगंटीवार यांनी केली. यावर त्‍वरीत योग्‍य कार्यवाही करण्‍यात येईल, असे जिल्‍हाधिका-यांनी सांगीतले. नागरिकांना कोरोना संदर्भात काही मदत अपेक्षित असल्‍यास पाच विभागांचा एक समूह तयार करण्‍यात आला असल्‍याचे जिल्‍हाधिका-यांनी सांगीतले. त्‍यात पोलिस विभाग, मनपा, जिल्‍हाधिकारी कार्यालय, सामान्‍य रूग्‍णालय, पोलिस नियंत्रण कक्ष यांचा समावेश आहे. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता तसेच सिव्‍हील सर्जन यांचाही समावेश करण्‍याची सूचना आ. मुनगंटीवार यांनी केली.
नागरिकांना औषधे उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने जिल्‍हयातील सर्वच ठिकाणचे नंबर्स उपलब्‍ध करावे व यासंदर्भात एक साखळी तयार करण्‍याची सूचना यावेळी आ. मुनगंटीवार यांनी केली. केमीस्‍ट अॅन्‍ड ड्रगीस्‍ट असोसिएशनच्‍या पदाधिका-यांची मदत या प्रक्रियेत घेण्‍यात यावी असेही ते म्‍हणाले. 
जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालय, उपजिल्‍हा रूग्‍णालये, ग्रामीण रूग्‍णालये, प्राथमिक आरोग्‍य केंद्र यासाठी सॅनिटायझर व मास्‍क उपलब्‍ध नसल्‍यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्‍या आहेत. यासंदर्भात बैठकीदरम्‍यान आ. मुनगंटीवार यांनी सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांच्‍याशी दूरध्‍वनीवरून चर्चा केली. उद्यापर्यंत सॅनिटायझर व मास्‍क शासकीय रूग्‍णालयांमध्‍ये व आरोग्‍य केंद्रांमध्‍ये उपलब्‍ध करण्‍याचे आश्‍वासन ना. राजेश टोपे यांनी दिले. तसेच 500 ml चे 1000 सॅनिटायझर चंद्रपूर जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालय तसेच बल्‍लारपूर, पोंभुर्णा येथील रूग्‍णालय व उपजिल्‍हा रूग्‍णालय मुल येथे आपण उपलब्‍ध करून देणार असल्‍याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगीतले.
 प्रामुख्‍याने जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयातून जेव्‍हा रूग्‍णांना सुटी दिली जाते तेव्‍हा वाहतुकीवरील निर्बंधामुळे त्‍यांना वाहने उपलब्‍ध होत नाहीत. त्‍यामुळे जिल्‍हा प्रशासनाने यासाठी स्‍वतंत्र सोय करण्‍याची सूचना आ. मुनगंटीवार यांनी केली. यासंदर्भात त्‍वरीत वाहनांची स्‍वतंत्र व्‍यवस्‍था रूग्‍णांना घरी पोहचविण्‍यासाठी केली जाईल असे जिल्‍हाधिकारी म्‍हणाले. चंद्रपूरसह जिल्‍हयातील सर्व प्रमुख शहरांमध्‍ये जाहीरातीचे जे खाजगी फलक आहेत त्‍यावर सध्‍या काही दिवस इतर विषयाच्‍या जाहीराती न करता केवळ कोरोना विषयी जनजागृती करणारे व मदतीबाबतची माहिती देणा-या जाहीराती या फलकांच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात याव्‍या, अशी सूचना आ. मुनगंटीवार यांनी केली. या सूचनेबाबत सुध्‍दा जिल्‍हाधिका-यांनी सकारात्‍मक कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने जिल्‍हा प्रशासनाला, आरोग्‍य यंत्रणांना आम्‍ही आवश्‍यक ते सर्व सहकार्य करण्‍यास तत्‍पर असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले.