चंद्रपुर जिल्ह्यातील ३८ गावातील घरकुलांचा तिढा अखेर सुटला.. जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या प्रदिर्घ पाठपुराव्याला अखेर यश




चंद्रपुर जिल्ह्यातील ३८ गावातील घरकुलांचा तिढा अखेर सुटला..
      जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या प्रदिर्घ पाठपुराव्याला अखेर यश

चंद्रपूर :दिनचर्या न्युज - 

        प्रगणकाने चुकीचा सांकेतांक क्रमांक दिल्यामुळे सन २०१६ मध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ३८ गावांतील पात्र घरकुल लाभार्थ्यांची नावे दुसऱ्या ग्रा.पं.मध्ये समाविष्ट झाले. त्यामुळे सदर लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम कायम करतांना ती नावे वगळण्यात आल्याने संबंधित पात्र घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देता येत नव्हता. 
       नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथील ६९ घरकुल लाभार्थ्यांनी ही बाब सर्वप्रथम जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचे लक्षात आणुन दिली. त्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेत जि.प.च्या पहिल्याच सर्वसाधारण व स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा रेटुन धरला. यावेळी हा एका गावचा मुद्दा नसुन जिल्ह्यातील ३८ गावांचा हा प्रश्न असल्याचे लक्षात आले. यात एकट्या नागभीड तालुक्यातील १३ गावातील २३२ लाभार्थी प्रभावित झालेले आहेत . यात मोहाळी ६ , कोथुळणा ४८, म्हसली १३, मौशी १२, पान्होळी १४, देवपायली ६, चिंधीचक ३२, गंगासागर हेटी ६, सोनापुर बुज.१३, किटाडी बोर.८, खडकी पा.५, व मिंडाळा ६९ यांचा  समावेश आहे.
       जि.प.च्या प्रत्येकच बैठकीत हा प्रश्न उपस्थित होत असल्याने तत्कालीन पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मुंबई ला ग्रामविकास खात्याचे सचिव व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत एका विशेष बैठकीत घरकुलाचा हा तिढा सोडविण्याचे निर्देश दिले. या बैठकीला चंद्रपुर जि.प.चे तत्कालिन अध्यक्ष देवरावजी भोंगळे, मुख्य कार्यपालन अधिकारी पापडकर यांचेसह संजय गजपुरे यांची उपस्थिती होती .
          पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे संबंधित घरकुल यादी मुळ ग्रा.पं.वळती करुन घेण्याचे ग्रामसभेच्या ठरावासह चंद्रपुर जि.प. ने जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणे मार्फत राज्यशासनाकडे शिफारसीसह पाठविला . व तो प्रस्ताव राज्यशासनाने केंद्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला. अखेर मुळ ग्रा.पं. ला ही पात्र लाभार्थ्यांची यादी वळती करण्याचे आदेश शासनाकडुन प्राप्त झाल्याने जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेमार्फत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे . आजपावेतो ३८ पैकी १९ गावांतील यादी मुळ गावात समाविष्ट करण्यात आली आहे. उर्वरित गावांची यादी लवकरच समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जि.ग्रा.वि.यंत्रणेचे अधिकारी प्रणव बक्षी यांनी दिली आहे . 
      जि.प . सदस्य संजय गजपुरे यांनी याबाबत शासनाचे व सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले असुन लवकरात लवकर प्राधान्याने या यादीतील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीची प्रक्रिया सुरु करुन आश्वस्त करण्याची मागणी केली आहे.