चंद्रपूर दि.२१ एप्रिल :
चंद्रपूर जिल्ह्यात काल एका आदेशाद्वारे वर्तमानपत्राच्या वितरणाला बंदी घालण्यात आली होती. मुख्य सचिव यांच्याकडून आलेल्या सूचनेनंतर ही बंदी उठविण्यात आली असून आवश्यक खबरदारी व काळजी घेत हे वितरण उद्यापासून सुरू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वृत्तपत्राचे वितरण काल एका आदेशाद्वारे मुख्य सचिव यांच्यामार्फत बंद करण्यात आले होते. या आदेशांमध्ये आज सुधारणा करीत फक्त ज्याठिकाणी कोरोना आजाराची साथ अधिक आहे, अशा बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका व साथीचा प्रभाव असलेल्या क्षेत्रामध्ये डोअर टू डोअर वर्तमानपत्राच्या वितरणाला मज्जाव करण्यात आला आहे.
या आदेशाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील घरपोच वितरणाला परवानगी देण्यात येत आहे. मात्र वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांनी, वृत्तपत्र घेणाऱ्यांनी मॉस्कचा वापर करावा, या मुलांना पुरेसे सॅनिटायझर पुरवण्यात यावे, आवश्यक सामाजिक दुरी ठेवण्यात यावी आदी खबरदारी विक्रेत्यांनी घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.