जिल्हयातील १३ हजार ७३९ मजुरांशी प्रशासनाकडून संपर्क साधणे सुरू



जिल्हयातील १३ हजार ७३९ मजुरांशी प्रशासनाकडून संपर्क साधणे सुरू

मुंबई- पुण्यातील विद्यार्थी, प्रवाशांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा

चंद्रपूर दि ३० एप्रिल : लॉकडाऊनमध्ये जवळपास १९ राज्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १३ हजारावर मजूर अडकले आहेत. तसेच राज्यात व राज्याबाहेर हजारो यात्रेकरू, विद्यार्थी, प्रवासी, अडकले आहेत. या सर्वांना जिल्ह्यात पोहचण्यासाठीच्या उपाय योजना जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
      यासंदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार बाहेर राज्यात व राज्याच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्या नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही अशा पद्धतीने जिल्ह्यात परत आणण्यासाठी संपर्क साधला जात आहे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांमुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
      चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक मजूर हे तेलंगाना राज्यात आहे. मजुरांची तेलंगाना मधील सध्या उपलब्ध असणारी आकडेवारी 10 हजार 558 आहे. त्यापाठोपाठ आंध्रप्रदेश मध्ये जवळपास 2643 नागरिक अडकले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत दिल्ली, गुजरात, राजस्थान, पंजाब ,उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा ,पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, दमन, तामिळनाडू, हरियाणा, गोवा,आदी राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांची माहिती आहे.
      याशिवाय राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्राशिवाय अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसाठी 24 तास संपर्क करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासाठी पाच दूरध्वनी लाईन सुरू केल्या असून ०७१७२- २७४१६६, ६७, ६८, ६९, ७० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 
तसेच सोबतच राज्यातील पुणे-मुंबई व इतर शहरांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी वरील क्रमांकावर आपली माहिती देण्याचे स्पष्ट केले आहे.
      जिल्ह्यामध्ये अडकलेल्या नागरिकांनी आपल्या भागात जाताना संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधणे आवश्यक आहे. प्रवासी व नागरिकांनी ज्या राज्यात जायचे आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती संबंधित तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी व आयुक्त महानगर पालिका यांच्याकडे दयावी. त्यानंतर जिथे जायचे आहे त्या ठिकाणासाठी परवाना घेणे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयातून वैद्यकीय दाखला घेणे आवश्यक आहे. बाहेर राज्यातून  व महाराष्ट्रातील अन्य शहरातून येणार्‍या प्रत्येक नागरिकाने देखील हीच प्रक्रिया लक्षात घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या वाहनावर परवानगी लावणे, तपासणी करणाऱ्या पोलिसांना सहकार्य करणे व आपल्या शहरात आल्यानंतर प्रत्येकाने 14 दिवसांसाठी होम कॉरेन्टाईन होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.