कोणतेही लक्षण आढळल्यास आरोग्य विभागाला तात्काळ माहिती द्या : जिल्हाधिकारी





कोणतेही लक्षण आढळल्यास आरोग्य विभागाला तात्काळ माहिती द्या : जिल्हाधिकारी

✨ जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
✨ पुढील सात दिवस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
✨ उद्रेकाच्या परिस्थितीतील मॉक ड्रिल यशस्वी
✨ फक्त जीवनावश्यक दुकाने पुढील काळात खुली राहणार
✨ आठवडाभर घराबाहेर पडावेच लागणार नाही याचे नियोजन करा
✨ गरज पडल्यास एखादा भाग सील करण्यात येईल
✨ आरोग्य विषयक माहिती लपून न ठेवण्याचे आवाहन
✨ भाजी बाजार व अन्य ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन
✨ 214 वाहने ताब्यात, 35 जणांना अटक, 95 जणांवर कारवाई
✨ हॅलो चंदा व इतर हेल्पलाईनचा वापर करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि ८ एप्रिल :
 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र देशासह राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे.कोरोनाचा उद्रेक झाल्यास सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र कोणीही आपला आजार लपवून ठेवू नये. माहिती लपवून ठेवू नये. रुग्णाची तपासणी करण्याची संपूर्ण तयारी जिल्ह्यात आहे.त्यामुळे पुढील काळात घराच्या बाहेर निघावे लागणार नाही असे आठवड्याभराचे नियोजन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
      चंद्रपूर जिल्हा एखाद्या अलिप्त किल्ल्याप्रमाणे सध्या पॉझिटिव रुग्णांपासून दूर आहे. त्यामुळे प्रत्येक गाव, प्रत्येक वार्ड, प्रत्येक शहर या आजारापासून दूर कसे राहील यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. नव्याने येणाऱ्या प्रत्येक माणसाची माहिती आरोग्य विभागाला द्या. कोणतीही माहिती लपवून ठेवू नका.आरोग्य विभाग व अन्य शासकीय कर्मचारी चौकशीसाठी आले असता त्यांना योग्य तो प्रतिसाद द्या. रुग्णाची पूर्ण काळजी घेण्यासाठी प्रशासन तयार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोणाच्याही हलगर्जीपणामुळे समाजाचे स्वास्थ्य धोक्यात येणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी आज केले आहे.
      आपत्कालीन परिस्थितीत उद्रेक झाल्यास करावयाच्या उपाययोजनांची मॉकड्रील जिल्हाधिकारी व प्रमुख अधिकार यांच्या उपस्थितीत पार पडले. जिल्हा येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामना देण्यास तयार आहे. कोणतीही उणीव राहू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी जिल्हातील नागरिकांची संवाद साधताना स्पष्ट केले.
   जिल्हाधिकारी यांनी काल एक नवीन आदेश काढत केवळ जीवनावश्यक वस्तू विक्री मध्ये भाजीपाला, किराणा सामान, दूध, ब्रेड,अंडी, मांस, मासोळी, बेकरी, पशुखाद्याची दुकाने, गॅसपुरवठा करणारी यंत्रणा सकाळी सात ते दुपारी दोन या काळात सुरू राहतील असे स्पष्ट केले आहे.या काळात कोणतेही वेगळे व्यापारी प्रतिष्ठान सुरू करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तथापि, इलेक्ट्रिकल व अत्यावश्यक दुरुस्ती संदर्भात कारागिरांनी घरी जाऊन सेवा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
      गंजवार्ड परिसरातील चंद्रपूर शहरातील भाजीपाला बाजाराला कोहिनूरी मैदानामध्ये सुरू करण्यात आले आहे. याशिवाय काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूची विक्री आहे .त्या ठिकाणी आणि सामाजिक दुरी पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहे. प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानासमोर हात धुण्याची, सॅनीटायझरची व्यवस्था करावी, असेही स्पष्ट करण्यात आले असून नागरिकांनी या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
      बँकेमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसून आले आहे. आवश्यकता नसताना बँकेच्या व्यवहार टाळण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाने दिला आहे. फारच गरज असेल तर सामाजिक दुरी राखून बँकेचा व्यवहार पार पडावा,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
     जिल्ह्यामध्ये विदेशातून आलेल्या एकाही नागरिकांची तपासणी बाकी राहिलेली नाही. 204 नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. एकाही नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह नाही. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अन्य राज्यातून अन्य जिल्ह्यातून आलेल्या 26 हजार 26 नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 10 हजार 994 नागरिक सध्या निगराणीत आहे.याशिवाय 14 दिवस होम कॉरेन्टाईन झालेल्या रुग्णांची संख्या 15 हजार 32 आहे. इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन रुग्णांची संख्या 20 आहे.
       चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून अन्य जिल्ह्यातील पाच हजारावर नागरिकांना शेल्टर होममध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येत आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. याशिवाय निमोनिया सदृश्य कोणत्याही आजाराची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. यापुढे कोरोना व त्या जास्ती साम्य असणाऱ्या कोणत्याही आजाराच्या संदर्भात लक्षणे आढळून आल्यास संबंधित सर्व नागरिकांची तपासणी केली जाणार आहेत. नागरिकांनी त्याला देखील प्रतिसाद द्यावा,असे आवाहन केले आहे.
         नागरिकांना कोणतीही ही अडचण जाऊ नये यासाठी विविध नियंत्रण कक्षाचे नंबर देण्यात आले आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.