संचार बंदीमुळे अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात जाण्यासाठी मोफत एसटी - मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार





संचार बंदीमुळे अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात जाण्यासाठी मोफत एसटी - मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर दि ६ मे : कोरोना आजाराच्या काळात संचार बंदीमुळे महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात जाण्यासाठी एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाणार असल्याची माहीती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात असणाऱ्या लोकांना त्यांच्या स्वगावी सोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी याबाबत चर्चा केली असून त्यांनी लॉक डाऊनमध्ये विविध जिल्ह्यात अडकलेल्याना त्यांच्या स्वगावी पोहचविण्यासाठी परिवहन बसेस देण्यास परवानगी दिली आहे. १० हजार मोफत बसेसद्वारे लॉक डाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात पोहचविण्याचे काम उद्यापासून सुरु होईल. याबाबतचे नियोजन, संबंधित जिल्हा प्रशासनाची माहिती, प्रवाशांना तपासण्याचे काम, आवश्यकता पडल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणाचे काम याबाबत सविस्तर चर्चा विभागाकडून करण्यात आली असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले