जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करा उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन





जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करा

उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन




चंद्रपूर,दि. 13 मे: दिनांक 10 मे 2020 च्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्याकरीता जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी शासकिय कार्यालये 100 टक्के कर्मचारी उपस्थितीवर सुरु ठेवण्याबाबत आदेशित केलेले आहे. त्याचे पालन म्हणुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय नियमीत सुरु झालेले असून, या कार्यालयामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज स्वीकारण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे.परंतु, विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यासाठी त्यांनी प्रथमतः दुरध्वनीद्वारे 07172-273661 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील इयत्ता 12 वी विज्ञानचे विद्यार्थी तसेच राज्य सामायीक परिक्षा अंतर्गत (सीईटी) व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेणारे विद्यार्थी, आरक्षित जागेवरील नियुक्त कर्मचारी तसेच आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढविणारे उमेदवार यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करण्यापूर्वी या कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 07172-273661यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधून आपल्या नावाची नोंदणी करावी.

नोंदणीदरम्यान उमेदवारांना जो दिनांक व वेळ देण्यात येईल त्या वेळेस उमेदवारांनी त्यांचे परिपुर्ण अर्ज, त्यासोबत आवश्यक असणारे दस्ताऐवज छायांकीत प्रतीमध्ये तसेच सर्व मुळ दस्ताऐवज यासह या कार्यालयास उपस्थित राहून आपले प्रस्ताव सादर करावे.

नोंदणीशिवाय प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज सादर करतांना चेहऱ्यावर मास्क परिधान करणे. एका अर्जाकरीता फक्त एकाच व्यक्तींनी उपस्थित राहणे, तसेच सामाजिक अंतर राखणे इत्यादीबाबत उमेदवारांनी दक्षता घ्यावी असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विजय वाकुलकर यांनी केले आहे