चंद्रपूर शहर, ऊर्जानगर व दुर्गापूर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये 17 ते 26 पर्यंत कडक लॉक डाऊनचंद्रपूर शहर, ऊर्जानगर व दुर्गापूर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये
17 ते 26 पर्यंत कडक लॉक डाऊन

१७ ते २१ जुलै पर्यंत कडकडीत बंद
२१ ते २६ जुलैला ९ ते २ जीवनावश्यक दुकाने उघडतील.

घराबाहेर पडणाऱ्यावर सक्त कारवाई करणार
कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम
प्रशासनाला सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

चंद्रपूर दि १५ जुलै : कोरोना बाधितांची संख्या अधिक वाढयला लागल्यामुळे चंद्रपूर शहर महानगर पालिका क्षेत्र, चंद्रपूर तालुक्यातील ऊर्जानगर व दुर्गापूर ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवार १७ जुलै ते रविवार २६ जुलै पर्यंत एकूण दहा दिवस कडेकोट टाळेबंदी अर्थात लॉक डाऊनची घोषणा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज सायंकाळी एका परिपत्रकाद्वारे केली आहे.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1993 च्या कलम 144 नुसार हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. या काळात कोणत्याही नागरिकाला घरा बाहेर पडता येणार नाही. दहा दिवसांचा हा बंद दोन टप्प्यात विभागण्यात आला आहे.

पुढील बाबी बंद असेल

१७ ते २१ या पहिल्या पाच दिवसात महानगर,ऊर्जानगर, दुर्गापुर या भागात कोणतेही दुकाने आस्थापना जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील बंद राहणार आहे. तर 21 ते 26 या कालावधीत पुढील पाच दिवसांसाठी केवळ अत्यावश्यक व खाद्य वस्तूंची पुरवठा करणारी दुकाने, त्यांचे ठोक विक्रेते, जसे खाद्य पदार्थ, किराणा,दूध दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड ,फळे, भाजीपाला अंडी, मांस,मासे, बेकरी, पशुखाद्य, कृषिविषयक अस्थापणा यांची दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत फक्त सुरू राहतील.
झोमॅटो, स्वीगी, डोमीनोज व शहरातील सर्व हॉटेल्स व खानपानच्या घरपोच सुविधा देखील 17 ते 21 बंद राहणार आहेत. त्यानंतर मात्र 21 ते 26 या कालावधीत केवळ घरपोच सेवा सुरू राहतील. फेरीवाले भाजीविक्रेते, फळविक्रेते, भाजी मार्केट देखील 17 ते 21 या काळात पूर्णतः बंद राहील. पुढे 21 ते 26 सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत सुरू राहील. मास, मासे, चिकन, अंडी इत्यादीची विक्री 17 ते 21 या काळात बंद असून 21 ते 26 या काळामध्ये सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत सुरू आहे. शाळा महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था,कोणत्याही प्रकारचे शिकवणी वर्ग, 17 ते 26 दहा दिवस पूर्णतः बंद असेल. सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने, दोन चाकी,तीन चाकी, चार चाकी वाहने, संपूर्णता बंद राहील. 17 ते 26 या काळामध्ये लग्न समारंभ, स्वागत समारंभ,बंद राहतील या कालावधीमध्ये यापूर्वी कोणी परवानगी घेतली असेल तरीही ती आज जारी केलेल्या एका आदेशाद्वारे रद्द समजण्यात यावी असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना व कार्यालय संपूर्णतः बंद राहतील.धार्मिक स्थळे ,प्रार्थनास्थळे ,बंद राहतील. नित्यनेमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरू ,पुजारी यांना फक्त करता येतील.

पुढील बाबी सुरु असतील

या काळामध्ये फक्त घरपोच दुधाचे वितरण सकाळी सहा ते दहा करता येईल. सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा पशुचिकित्सालय नियमित सुरू राहतील. सर्व रुग्णालय, औषधालय ( मेडिकल स्टोअर्स ) तसेच रुग्णालयाची निगडित सेवा अस्थापना नियमित वेळेनुसार सुरू राहतील. रुग्णालय, दवाखाने सुरु असतील. लॉक डाऊनचा आधार घेऊन रुग्णांना दवाखाने अत्यावश्यक वैद्यकीय सेवा नाकारणार नाही. अन्यथा संबंधित रूग्णसेवा संस्थांवर कारवाई करण्यात येतील. सर्व मेडिकल दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहतील. तथापि ऑनलाईन औषध वितरण सेवा, रुग्णालय सौरभ औषधांची दुकाने 24 तास सुरू राहतील. सर्व न्यायालय, राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालय सुरू राहतील. शासकीय कार्यालयांना आवश्यक कर्मचाऱ्यांसाठी पासची आवश्यकता राहणार नाही. तथापि संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःचे ओळखपत्र सोबत बाळगणे अत्यावश्यक राहील. या काळात शासकीय कर्मचाऱ्यांना सुटी नाही.
पेट्रोल पंप, गॅस पंप, सकाळी नऊ ते सहा या वेळेत सुरू राहतील. शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरविणारे वाहने, अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहने, कृषी व्यवसायाशी निगडीत सर्व यंत्र वाहने,कार्यरत असलेले उद्योग व औद्योगिक आस्थापनेशी संबंधित वाहने ,सर्व प्रकारची मालवाहतूक, वाहने, वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित वाहने, व शासनाने वेळोवेळी परवानगी दिलेली वाहने, यांना इंधन पुरवठा करावा. या व्यतिरिक्त इतर कोणासही इंधनाचा पुरवठा करण्यात येऊ नये, एलपीजी गॅस सेवा, घरपोच गॅस वितरण, रेशन दुकान नियमानुसार सुरू राहील. निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक शासन निर्णयानुसार सुरू राहील. दैनिक वर्तमानपत्रे, त्यांची कार्यालये, नियतकालिके, याची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजिटल प्रिंट मिडिया यांची कार्यालये सुरू राहतील. वृत्तपत्राचे सकाळचे वितरण सुरू राहील. वर्तमानपत्र वितरण सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये करता येणार आहे. राष्ट्रीयकृत आरबीआयची मान्यता दिलेल्या बँका, सहकारी बँका, गाव पातळीवर विविध कार्यकारी सोसायट्या, एलआयसी कार्यालय, किमान मनुष्यबळाचा किंवा सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत सुरू राहतील. बँकेच्या ग्राहक सेवा, एटीएम केंद्र सुरू राहील. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आपली वाहने कार्यालयीन वेळेत वापरता येतील.मात्र त्यांनी आवश्यकतेनुसार आपले ओळखपत्र पोलिसांना दाखविणे गरजेचे राहील. अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या सर्वांनी तसेच आशा वर्कर, मेडिकल शॉपचे कर्मचारी ,वर्तमानपत्र, प्रिंट इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडियामध्ये काम करणारे कर्मचारी यांनी स्वतःच्या कार्यालयाचे , आस्थापनांचे ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे.
 एमआयडीसी आणि खाजगी जागेवर सध्या चालू असलेले सर्व औद्योगिक आस्थापना दिनांक 17 ते 21 या कालावधीत केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवून सुरू ठेवता येईल. त्यानंतर 21 ते 26 या कालावधीत नियमित सुरू ठेवता येईल .आपल्या अस्थापना वरील कर्मचाऱ्यांना ओळख पत्र पुरविण्याची जबाबदारी आस्थापनांची असेल. दोन चाकी वाहनावर केवळ एक व्यक्ती ,चारचाकी वाहनात केवळ तीन व्यक्ती, कंपनीने प्राधिकृत केलेल्या प्रवासी बसमध्ये ५० टक्के क्षमतेने वाहन वापरण्यास परवानगी आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना नियमितपणे कामावर उपस्थित राहता येईल. त्याकाळातील बंदोबस्तात पोलिसांना आपले कार्यालयाचे आयकार्ड दाखविणे मात्र अनिवार्य असून सुरक्षा व्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.


नागरिकांनी सहकार्य करावे : ना. वडेट्टीवार
 चंद्रपूर शहर व लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या पुढे येत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दहा दिवसांचा हा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला, असल्याचे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. परिस्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी या काळात घरीच राहावे, या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागामार्फत चाचणी शहरात सुरू होणार आहे. या चाचणीला प्रतिसाद देण्यात यावा.तसेच कोणीही आजार लपून नये. तसेच बाहेरून आल्यास तपासणी करावी,असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रुग्ण वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी यापुढे अशाच पद्धतीने बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाने आपली नोंद केली तर जनजीवन सामान्य पद्धतीने सुरू राहील. सार्वजनिक ठिकाणी शिस्त न पाळल्यास जानाळा सारख्या प्रसंग उद्भवू शकतो. याठिकाणी लग्नातल्या जवळपास सर्व नागरिकांना कोरोना आजाराची लागण झाली. यामध्ये त्यांचा कुठलाही दोष नाही अशा नागरिकांना देखील कोरोना बाधित व्हावे लागले आहे त्यामुळे सार्वजनिक आयोजन पुढील काळामध्ये बंद ठेवण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. चंद्रपूर महानगर व लगतच्या परिसरातील या दहा दिवसाच्या बंदला जनतेने सहकार्य करावे,अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.