संविधानाने ओबीसी समाजाला दिलेले न्याय - हक्क मिळविण्यासाठी चंद्रपूरच्या मोर्चात सहभागी व्हा!


संविधानाने ओबीसी समाजाला दिलेले न्याय - हक्क मिळविण्यासाठी चंद्रपूरच्या मोर्चात सहभागी व्हा,

= भद्रावतीच्या ओबीसी प्रबोधनात्मक परिषदेत बळीराज धोटे यांचे प्रतिपादन =

चंद्रपूर :- दिनचर्या न्युज
..............................................................
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात तयार केलेल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील तमाम ओबीसी समाजाला दिलेले न्याय हक्क मिळविण्यासाठी ; ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहीजे.ही प्रमुख मागणी घेऊन दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी भारतीय संविधान दिनी चंद्रपूर येथे ओबीसी समाजाच्या मोर्चाचे आयोजन केलेले आहे. या मोर्चात ओबीसी समाज बंधू -भगिनिंनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन एकतेचे दर्शन घडवून आणावे असे आवाहन जिल्हा ओबीसी समन्वय समितीचे संयोजक बळीराज धोटे यांनी केले.

चंद्रपूर येथे ओबीसी समन्वय समितीच्या वतीने दिनांक 21 नोव्हेंबर ला दुपारी दोन वाजता शहरात एक हजारावर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्व ओबीसी बांधवांनी परिवारासह रॅलीत सहभागी व्हावे. तसेच 26 नोव्हेंबर 2020 लाखोंचा संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, आता नाही तर कधी नाही, म्हणून आपल्या मुला बाळाच्या भविष्यासाठी ओबीसी समाजातील सर्व घटकांनी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बैठका घेण्यात येत आहे. आपणही आपल्या परिसरातील ओबीसींना जागृत करा!
भद्रावती येथे
दि. १७ नोव्हेंबर रोजी स्थानिक अभिषेक मंगल कार्यालयात ओबीसी समाज प्रबोधनात्मक परिषदेत मार्गदर्शन करतांना जिल्हा ओबीसी समन्वय समितीचे संयोजक बळीराज धोटे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते . याप्रसंगी ओबीसी विचारपिठावर बळीराज धोटे,अँड. पुरुषोत्तम सातपूते, अँड. दत्ताजी हजारे,नगराध्यक्ष अनिल धानोरकर, अँड . अंजली साळवे आणि डॉ. बाळकृष्ण भगत आदि मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना बळीराज धोटे पुढे म्हणाले की, देशात साठ टक्के ओबीसी समाज आहे. हा समाज कष्टकरी व नवनिर्माण करणारा महत्वपूर्ण समाज आहे परंतु हा समाज वर्षानुवर्षे उपेक्षीत आहे. या समाजाला संवैद्यानिक पध्दतीने आंदोलन करूनच न्याय -हक्क मिळविण्याची वेळ आली आहे. २०२१ मध्ये होणारी जनगणना जातनिहाय झाली पाहीजे. ही प्रमुख मागणी घेवून चंद्रपूर येथे २६ नोव्हेंबर रोजी अत्यंत शांत पध्दतीने तसेच कोरोना संक्रमण काळातील सर्व शासकीय व प्रशासकीय निर्देशाचे पालन करून या आंदोलनाला सुरूवात होत आहे. चंद्रपूरच्या मोर्चाची दखल देशपातळीवर घेतली जाणार असल्याचे बळीराजधोटे यांनी यावेळी सांगितले.
अँड. अंजली साळवे म्हणाल्या की, २०२१ ची जनगणना जातनिहाय झाली पाहीजे ;यासाठी जनगणनेत सहभागी नाही . अश्या प्रकारच्या पाटया लावण्याची मोहीम चंद्रपूर जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रात सूरू आहे . जात निहाय जनगणनेची मागणी घेऊन न्यायालयीन लढाई लढल्या जात आहे. संसदेत खा. बाळूभाऊ धानोरकर आणि विधिमंडळात आ. अमोल कोल्हे यांनी सुध्दा जातनिहाय जनगणना व्हावी. यासाठी आवाज उठविला. यासोबतच लोकप्रतिनिधीवर प्रभावी दबाव गट निर्माण करण्यासाठी समस्त ओबीसी समाजाने चंद्रपूर येथील २६ नोव्हेंबरच्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन अँड. अंजली साळवे यांनी केले.
अँड. दत्ता हजारे यावेळी म्हणाले की, १९५० पासून विविध आयोग गठीत झाले. परंतु ओबीसी समाजाच्या उत्कर्षाला गती देणारा आयोग गठीत झाला नाही.ओबीसींना विशिष्ट जाती धरून चालणार नाही. ओबीसी एक सामुदायीक चळवळ झाली पाहीजे. ही चळवळ कुठल्याही राजकीय पक्षाची नाही. प्रत्येकानी या चळवळीत तन, मन व धनाने योगदान देऊन २६ नोव्हेंबरच्या चंद्रपूर येथील मोर्चात सहभागी व्हावे. असे आवाहन अँड. दत्ताजी हजारे यांनी केले.
अँड. पुरुषोत्तम सातपूते यावेळी म्हणाले की, २६ नोव्हेंबरचा मोर्चा हा ओबीसी समाजाचा आहे कुठल्याही जातीचा, पक्षाचा किंवा समितीचा नाही. या मार्चात कोरोना संक्रमण कालावधीतील सर्व शासकीय व प्रशासकीय निर्देशाचे पालन करण्यात येईल. या मार्चाच्या निमित्याने कुणालाही कुठलेही श्रेय घ्यायचे नाही. शंका -कुशंका न ठेवता निर्भयपणे मोर्चात सहभागी व्हावे. असे प्रतिपादन अँड. पुरूषोत्तम सातपुते यांनी केले.
       या परिषदेचे प्रास्ताविक पांडूरंग टोंगे, सुत्रसंचलन अजय बोंडे आणि आभार प्रदर्शन प्रा.विनोद घोडे यांनी केले. कोरोना संक्रमणाचे प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून या प्रबोधनात्मक परिषदेत ओबीसी समाजातील बंधू -भागिनी सहभागी झाले होते . या परिषदेपूर्वी भद्रावती शहरातून जनजागृतीपर बाईक रॅली काढण्यात आली.