वेग वेगळ्या छंदातून पालकांनी मुलांना मानसिक बळ द्यावे - बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे

वेग वेगळ्या छंदातून पालकांनी मुलांना मानसिक बळ द्यावे - बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे

यांनी साधला फेसबुक संवाद

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, ता. २ : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक जवळची माणसं गेलीत. कोरोनाच्या बातम्या आणि चर्चा कानावर पडू लागल्याने लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम जाणवू लागले आहेत. संचारबंदीमुळे मुलांना बाहेर खेळाता येत नाही. त्यामुळे त्यांचे बालपण कोंडल्यासारखे झाले आहे. घरगुती खेळ, चित्रकला आणि छंदाच्या माध्यमातून पालकांनी मुलांना मानसिक बळ द्यावे, असे आवाहन बालरोगतज्ज्ञ् डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने आयोजित "संवाद" या फेसबूक लाइव्ह कार्यक्रमात २ जुलै रोजी 'कोविड-१९ ची संभाव्य तिसरी लाट आणि लहान मुलांची घ्यावयाची काळजी' या विषयावर बालरोगतज्ज्ञ् डॉ. अभिलाषा गावतुरे (बेहेरे) यांनी संवाद साधला. यावेळी मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांनी सहभाग घेतला.

डॉ. अभिलाषा गावतुरे म्हणाल्या, दुसऱ्या लाटेत ८ ते १० टक्के बालक प्रभावित झाले होते. ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे. अशा बालकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असते. हृदयरोग, एड़स, उच्च रक्तदाब आणि अन्य आजार असलेल्या बालकांना अधिक धोका असतो. बालकांचे लसीकरण झाल्यास संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कमी होऊ शकतो. साधा ताप आला की आपण मुलाना डॉक्टरकडे घेऊन जातो. अशावेळी आपल्याला कोरोना झाला, अशी मानसिकता लहान मुलं करून घेतात. मृत्यूच्या भीतीपोटी नैराश्यतेचे जीवन जगू लागतात. आई-वडिलांचे तणाव मुलांच्या मानसिक आरोग्य परिणाम करू लागते. ते मनातील भीती दुसऱ्यांना सांगू शकत नाहीत. अशावेळी मुलं चिंताग्रस्त दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. गावतुरे यांनी केले.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सामाजिक अंतर राखावे, नियमित मास्क वापरावे, हात स्वच्छ धुवावे. लहान मुलांना मास्क घालताना श्वास घेता यावा आणि दोन वर्षाखालील बालकांना शक्यतोवर मास्क घालू नये, असे देखील त्यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

दिनचर्या न्युज