तत्ववादी : एक अतुलनीय व्यक्तीमत्व, एड. मोरेश्वरराव टेमुर्डे - डॉ.यशवंत घुमे, भद्रावती

तत्ववादी : एक अतुलनीय व्यक्तीमत्व,
एड. मोरेश्वरराव टेमुर्डे - डॉ.यशवंत घुमे, भद्रावती

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-

काही माणसे नारळासारखी कठोर असतात. वरून नारळाच्या टोकरासारखी कडक परंतु अंतर्मन मात्र गरासारखे नाजूक आणि कोमल. त्यांच्या मनात सामान्य माणसांबद्दल जिव्हाळा असतो. कृती आणि वाणी यात जराही तफावत न करता अशी माणसे स्वतःला एका विशिष्ट आचरण शैलीत बंदिस्त करून घेतात. *"आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना"* हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं ब्रीद असतं. अशी माणसे कितीही प्रतिकूल परिस्थिती आलीतरी मुळीच घाबरत नाही. परिस्थितीला शरण जात नाही. तर आपल्या कृतीने परिस्थितीला वाकायला लावतात आणि आपल्या वागणुकीतून समाजापुढे नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. कोणी कितीही विरोध केला तरी सत्याची पाठराखण करताना जराही विचलित होत नाहीत. कोणी साथ देवो वा न देवो ते आपल्या मार्गाने मार्गक्रमण करत असतात. प्रसंगी *एकला चलो रे* अशी पाळी आली तरी जराही न डळमळता पुढे जात राहतात. आपल्या तत्त्वांशी मुळीच तडजोड करीत नाही. अखेर *संघर्षाच्या जोरावर जिद्दीने यशोशिखर गाठून नव्या पिढीला दिशा देण्याचे मौलिक कार्य ते करतात. प्रसिद्धी व कौतुक यापासून कोसो दूर असलेली आणि प्रसंगी आपल्या तत्त्वांसाठी झपाटलेली अशी ही माणसे युवा पिढीसाठी दिपस्तंभ ठरतात*. *सदैव केवळ पुस्तकातूनच वाचायला मिळणारी ही माणसे प्रत्यक्षात जेव्हा समोरासमोर अनुभवायला मिळतात तेव्हा तो आनंद शब्दात व्यक्त होत नाही. ही माणसे जीवनाच्या रस्त्यावर भेटली तर मनाला भावतात.आनंद देऊन जातात. असेच मनाला भावलेलं एक अतुलनीय व्यक्तिमत्व म्हणजे एड. मोरेश्वरराव टेमुर्डे हे होत*.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील कोळशी हे त्यांच्या पूर्वजांचे मूळ गाव. पुढे वरोरापासून पाच किलोमीटर अंतरावरील मोहबाळा या गावी त्यांचे आजोबा स्थिरस्थावर झालेत. वडील विठ्ठलराव टेमुर्डे यांना मोडी लिपीचे ज्ञान असल्याने त्यांना श्रीमंत केशवराव गोपाळराव बुटी (नागपूर) यांनी चिमूर तालुक्यातील शेती सांभाळण्याची जबाबदारी सोपविली.आणि वडील विठ्ठलराव बुटी यांच्याकडे दिवाणजी म्हणून काम पाहू लागले. *अतिशय शिस्तबद्ध स्वभाव असलेल्या वडिलांच्या तालमीत मोरेश्वररावांचे व्यक्तिमत्त्व आकार घेऊ लागले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कठोर मेहनत व परिश्रम तथा जाज्वल्य इच्छाशक्तीच्या भरोशावर स्वपंखाने आकाश तोलीत चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी घेतलेली गगनभरारी लक्षणीय आहे*. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील या व्यक्तित्वाने मिळवलेले यश नेत्रदीपक असे म्हणायला हरकत नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव शालेय जीवनापासूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर राहिलेला आहे. पुढे वकीली करीत असताना डबले वकीलांच्या सहवासात पॉंडेचरी येथील योगी अरविंद आणि माताजींच्या विचारांचा प्रभावही त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडला.

*शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. प्रगती करावयाची असेल आणि यशोशिखर गाठायचे असेल तर शिक्षण ही माणसाची महत्त्वाची गरज आहे हा विचार त्यांच्या मनावर प्रतिबिंबित झाला*. जसे पोटाला अन्न आवश्यक तसेच मेंदूला वाचनाची आवश्यकता हे त्यांना विद्यार्थी दशेतच पटले. त्यासाठी पुढे जेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यात स्वकर्तृत्वाने काहीतरी करून दाखविण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी *वरोडा,चिमूर, भद्रावती तालुक्यात विविध शैक्षणिक उपक्रमांना सुरुवात करून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे*.

1978 मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या *विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा* या शैक्षणिक संस्थेंतर्गत सर्व सोयींनी युक्त अशा शालेय इमारती व शैक्षणिक वातावरण पाहता त्यांच्या शिक्षणविषयक कळकळीची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी स्वतः गरिबीत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. *कधी अनवाणी पायाने चालत तर कधी ओल्या कपड्यानीशी वर्गात बसून शालेय शिक्षण ग्रहण केले*. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने घरून आर्थिक रसद बंद झाल्यावर *नागपूर येथे वकीलीचे शिक्षण घेताना जवळजवळ बावीस दिवस केवळ फुटाणे खाऊन अर्धपोटी राहुल कायद्याचे शिक्षण ग्रहण केले*. अशी गरिबी आणि शिक्षणातील रुकावट इतरांच्या वाट्याला येऊ नये. विपरीत परिस्थिती शिकणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटा मोकळ्या करण्यासाठी विद्यार्थ्यांहित लक्षात घेत स्वानुभवावरून त्यांनी विद्यार्थ्यांना अद्यावत सोयीनी सुविधायुक्त शाळा निर्माण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या शाळांच्या प्रशस्त इमारती पाहिल्या की शिक्षणाप्रती त्यांच्या समर्पित प्रामाणिकपणाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. केजी टू पीजी असे शालेय उपक्रम सुरू केले. *आपल्या स्वप्नातील शैक्षणिक संस्थेला आकार देताना त्यांना प्रसंगी स्वकियांशीही संघर्ष करावा लागला.कठोर वागावे लागले. बरेचदा स्वभावाला न पटणार्‍या गोष्टीही कराव्या लागल्या. त्रास सहन करावा लागला. परंतु त्यांनी शैक्षणिक संस्थेला यशोशिखरावर नेण्याचा ध्यास सोडला नाही*. अनंत अडचणींचा सामना करीत त्यांच्या स्वप्नातील शैक्षणिक उपक्रम आज डौलात उभा आहे. विद्यार्थीभिमुख निर्णय हे त्यांच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

वरोडा येथील नेताजी शाळेतून माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर यांना प्रारंभीच्या दिवसात नोकरीसाठी संघर्ष करावा लागला. प्रारंभी वरोरा येथील हिरालाल लोया विद्यालयात शिक्षकाची नोकरी पत्करली.नंतर कर्मवीर विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तेथे नोकरी करीत असताना *संस्थाचालकांशी तात्विक वाद झाल्यामुळे त्यांनी मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिला*. आणि यापुढे नोकरी करायचीच नाही असे मनात ठामपणे ठरवून त्यांनी कायद्याची पदवी ग्रहण करण्यासाठी नागपूर गाठले. *"कमवा आणि शिका" या उक्तीप्रमाणे काम करीत वकिलीचे शिक्षण पूर्ण केले*. त्यांना महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाविषयी सुरूवातीपासूनच प्रेम असल्याने ते कृतीतून व्यक्त करण्यासाठी त्यांनी गांधी जयंतीच्या दिवशी पासून म्हणजे 2 ऑक्टोंबर, 1968 पासून वरोरा येथे स्वतंत्रपणे वकिलीचा व्यवसाय सुरू केला. कठोर परिश्रम करून याही क्षेत्रात त्यांनी नावलौकिक कमविला. या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संपर्क वाढत गेला. कष्टकरी, वंचितांच्या वेदना कळत गेल्या. त्यांच्यातील नेतृत्वशील स्वभावाने प्रस्थापितांच्या विरोधात बंडखोरी सुरू केली आणि कळत-नकळत ते समाजकारणाकडे ओढल्या गेले. *समाजकारण करायचे असेल तर राजकीय सत्ता हातात असायला हवी. ज्यांच्याकडे राजकारणाच्या चाव्या असतात ते त्या सत्तेच्या भरोशावर समाजाच्या उद्धाराची, सामाजहीताची कोणतीही गोष्ट सहजपणे करू शकतात. ही जाणीव झाल्याने ते राजकारणात उतरले*. विविध आंदोलने आणि दांडगा जनसंपर्क या माध्यमातून लोकांशी नाळ जुळत गेली. ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, सहकारी बँकेचे सदस्य, दोनदा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष, दोनदा खासदारकीची निवडणूक अशा विविध प्रकारच्या निवडणुका आयुष्यात लढले. *निवडणुकांच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेचा उपयोग जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला*. 1984 मध्ये ते शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या संपर्कात आले. आपल्या लढाऊवृत्तीने त्यांनी शेतकरी संघटनेच्या साध्या सदस्य पदापासून तर पुढे *आपल्या कर्तृत्वाच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर सरसेनापती पदापर्यंत झेप घेतली*. आपल्या कार्याची चुणूक दाखविली अन् शरद जोशी यांचे अतिशय विश्वासू कार्यकर्ते ठरले.

1985 मध्ये त्यांनी भद्रावती विधानसभेची निवडणूक लढवून आमदार झाले. याच क्षेत्रातून पुन्हा 1990 मध्ये आमदार म्हणून त्यांची फेरनिवड झाली. या काळात एक कर्तव्यदक्ष जनप्रतिनिधी म्हणून ते सदैव चर्चेत राहिले. *विधानसभेत सदैव प्रश्न विचारून आपल्या क्षेत्रातील प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली*. तत्कालीन काळात प्रसारमाध्यमांनी देखील त्यांची विशेष दखल घेतली होती हे प्रामुख्याने सांगावेसे वाटते. आपल्या जागृत स्वभावाने ते मतदारांमध्ये जागृत लोकप्रतिनिधी म्हणून लौकिकास आले. राजकीय कौशल्याने विविध पक्षात नवनवीन मित्र जोडले. परिणामतः 19 जुलै, 1991 मध्ये लोकशाहीत राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र *विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली*. 1993 मध्ये विधानसभा अध्यक्षांच्या जागतिक परिषदेतही सहभागी होण्याची संधी मिळाली. या निमित्ताने त्यांनी फ्रान्स, इंग्लंड, स्विझरलँड, बहारीन इत्यादी देशांना भेटी देऊन तेथील अभ्यास केला. *सत्तेवर असताना देखील त्यांनी आपल्या मतदारांची नाळ तुटू दिली नाही. सदैव आणि सतत मतदारांच्या संपर्कात राहून आपल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केले*. *गाव तिथे रस्ता, संपूर्ण मतदारसंघात विद्युतीकरण, प्राथमिक शाळेच्या इमारतीचे बांधकाम, गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयी, शेतकऱ्यांसाठी सिंचन* या उपक्रमांचा त्यांनी केलेल्या कार्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. *प्रामुख्याने शेतकरी संघटनेचे आंदोलन ज्यात कर्जमुक्ती आंदोलन, दारुबंदी आंदोलन, लक्ष्मीमुक्ती अभियान,शेती खर्चावर आधारीत कापसाला वाजवी भाव, स्थानिक पातळीवरील विविध आणि प्रासंगिक आंदोलने याचा त्यात उल्लेख करता येईल. आयुष्याच्या सुरुवातीपासूनच ते विविध आंदोलनात आपला सक्रिय सहभाग नोंदवत असल्याने खऱ्या अर्थाने आंदोलनवीर ठरले असे म्हणता येईल*. असे सांगतात की राजकारणात माणसाला अनेक तडजोडी कराव्या लागतात. परंतु त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही तडजोड स्वीकारली नाही हा त्यांच्या स्वभावाचा विशेष पैलू म्हणता येईल. *राजकारणात राहूनही त्यांनी आपली साधनसुचिता भंगू दिली नाही*. प्रामाणिकपणाच्या शिदोरीच्या भरोशावर देशातील महत्त्वपूर्ण राजकारणी म्हणून परिचित असलेल्या शरद पवारांचा विश्वास त्यांनी संपादन केला. आणि ते *देशाच्या राजकारणात विशेष स्थान प्राप्त असलेल्या शरद पवार यांचे विश्वासू सहकारी ठरले*. एक प्रामाणिक राजकारणी म्हणून पवारसाहेब आजही त्यांच्याकडे आदराने बघतात. पवार साहेबांकडे त्यांच्या शब्दाला विशेष वजन आहे. परंतु त्यांनी त्या ओळखीचा स्वतःसाठी कधीही गैरफायदा घेतला नाही.

राजकारणात राहूनही त्यांनी सत्तेतून चलअचल संपत्ती वाममार्गाने कमविण्याचा प्रयत्न केला नाही. ते खऱ्या अर्थाने संघर्षयात्री आहेत. आपण दुसऱ्याच्या कामी यावे असे त्यांना वाटते. वयाच्या ऐंशीव्या वर्षात पदार्पण करीत असताना सुद्धा ते होतकरू विद्यार्थ्यांना व अन्य गरजूंना आपल्या परीने आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करीत असतात.*मरणोपरांत देहदानाचा संकल्प करून त्यांनी नव्या पिढीला अवयवदानाचे महत्त्व समजून सांगण्याचा कृतीशील प्रयत्न केलेला आहे*. तरुणाईच्या मनात विधायक विचारांची पेरणी करणाऱ्या ॲड मोरेश्वरराव टेमुर्डे यांनी वयाची ७९ वर्षे आज पूर्ण केली. यानिमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाला शब्दांकित करण्याचा एक छोटासा प्रयत्न. त्यांना निरोगी आणि निरामय आरोग्य लाभो हीच शुभकामना.

दिनचर्या न्युज