शेगावात नाभिक समाजाचं द्वितीय साहित्य संमेलन






शेगावात नाभिक समाजाचं द्वितीय साहित्य संमेलन

*चंद्रपूर (प्रतिनिधी)*

नाभिक समाजाचं द्वितीय साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संपन्न होणार आहे. १५ जानेवारी २०२२ ला शहरातील विघ्नहर्ता हॉल येथे हे एकदिवसीय साहित्य संमेलन होणार आहे. 'महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पन संघा'नं या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आहे. या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक, मार्गदर्श आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम यांची निवड करण्यात आली आहे. ते अमरावती येथे झालेल्या पहिल्या नाभिक साहित्य संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांच्याकडून संमेलनापदाची सुत्रे स्विकारतील. सातारा येथील सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार आणि व्याख्याते कॅप्टन महेश गायकवाड हे या संमेलनाचे उद्घघाटक असतील. यात समाजातील साहित्यिकांना व्यासपीठ निर्माण करून देणा-या 'विशेष स्मरणिके'चं विमोचन होणार आहे. सोबतच समाजातील लेखक आणि कवींच्या अनेक पुस्तकांचं प्रकाशनही या संमेलनात होणार आहे.

या एकदिवसीय संमेलनात विविध कार्यक्रम, परिसंवाद, कथाकथन आणि कविसंमेलनाच्या सत्रांची रेलचेल असणार आहे. नाभिक 'समाजाची संस्कृती, समस्या आणि भविष्याच्या वाटचाली'वर संमेलनात चर्चा होणार आहे. यासोबतच समाजाला दिशादर्शक ठरलेल्या अनेक मान्यवरांचा या संमेलनात गौरव करण्यात येणार आहे. गौरवमूर्तींमध्ये आंतरराष्ट्रीय हेअर डिझायनर उदय टके, स्पर्धा परिक्षा पुस्तकांचे यशस्वी लेखक 'के सागर', सामाजिक कार्यकर्त्या सुमनताई पवार, अलिबागचे सुप्रसिद्ध हेअर डिझायनर सुशील भोसले, अहमदनगरचे अशोक औटी, अखिल भारतीय जेष्ठ नागरिक समाजाचे भालचंद्र गोरे, क्रांतीकारक विचारांचे कार्यकर्ते गोविंद दळवी, सुधाकर सनंसे, अखिल भारतीय सेन समाजाचे पुखराज राठोड, नाशिकचे समाधान निकम, समाजातील जळगावचे प्रथम आयएएस सौरभ सोनावणे, व-हाडी शब्दकोशकार शिवलिंग काटेकर आणि नागपूर येथील मराठी वा:डमयाच्या अभ्यासक रिता धांडेकर यांचा समावेश असणार आहे.

संमेलनाच्या यशस्वीतेसीठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शेगावची स्थानिक आयोजन समिती संमेलन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. या संमेलनाला राज्यभरातील समाजबांधवांनी उपस्थित राहत साहित्याचा आस्वाद घेण्याचं आवाहन महाराष्ट्र नाभिक कलादर्पण संघानं केलं आहे.

दिनचर्या न्युज