सामाजिक व साहित्य क्षेत्रातील वंचितांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याचं काम विमल दिवसाच्या माध्यमातून व्हावं- आमदार किशोर जोरगेवार
सामाजिक व साहित्य क्षेत्रातील वंचितांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याचं काम विमल दिवसाच्या माध्यमातून व्हावं- आमदार किशोर जोरगेवार

सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून विमलताईंना आदरांजली

◆*व्यक्ती आणि वाङ्‌मय, कोवळेकंच यासह विविध अप्रकाशित साहित्यांचे प्रकाशन*

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर दि. 26 मार्च : येथील प्रसिद्ध साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रा. विमल गाडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक तसेच साहित्य क्षेत्रातील वंचितांचे अप्रकाशित कार्य व त्यांचे साहित्य प्रकाशित करण्याचे काम नियमितपणे विमल दिवसाच्या माध्यमातून व्हावे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात स्वर्गीय प्रा. विमलताई गाडेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित 'विमल दिवस' या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान गाडेकर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार किशोर जोरगेवार, डॉ. बंडू रामटेके, प्रसिद्ध कवी बबन सराडकर, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रतिभा वाघमारे, डाॅ. शरदचंद्र सालफळे त्यासोबतच सामाजिक तथा साहित्य क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

गेल्यावर्षी कोरोना प्रतिबंधात्मक काळामध्ये विदर्भातील ख्यातनाम साहित्यिक कवित्री व समाजसेविका प्राध्यापक विमल गाडेकर यांचे मुंबईत निधन झाले त्यांची कर्मभूमी चंद्रपूर होती त्यामुळे त्यांचे कुटुंब व त्यांच्या चाहत्यांकडून आज त्यांच्या प्रथम स्मृती दिवसाला विमल दिवस आयोजन करण्यात आले होते.
'विमल दिवस' हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करावा, असे सांगून आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, फार मोठं लेखनाचं कार्य स्वर्गीय प्राध्यापक विमलताई गाडेकर यांनी साहित्य क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात केले आहे. त्यांचे हे कार्य साहित्य क्षेत्रातील सर्वांनी पुढे न्यावं, केवळ दोन तासाचा हा कार्यक्रम न घेता सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात वंचित राहिलेल्यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशात आणण्यासाठी हा कार्यक्रम नियोजनबद्धपणे यापुढेही राबवावा असेही ते म्हणाले.

प्रसिद्ध कवी बबन सराडकर म्हणाले, असंख्य अशा आठवणी विमलताई गाडेकर यांनी मागे ठेवल्या आहेत. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गाडेकर कुटुंबांनी हा कार्यक्रम घडवून आणला. यावेळी त्यांनी विदर्भातील तत्कालीन साहित्यिक व साहित्य क्षेत्रातील नवागतांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विमल त्यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.

यावेळी त्यांच्या 'कोवळेकंच ' या अप्रकाशित साहित्यकृतीचे प्रकाशन बबन सराडकर यांनी केले. या संग्रहामध्ये त्यांच्या अप्रकाशित कविता, कथा, हायकू, चारोळ्या यांचा समावेश आहे, या पुस्तकाच्या निर्मिती संदर्भात नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी माहिती दिली. विमलताई एका वटवृक्षासारख्या होत्या. त्यांच्या पारंब्यामुळे अनेकांना सावली मिळाली. साहित्यक्षेत्रातील कसदार लेखनाने विमलताई गाडेकर यांचे नाव पुढे आले. त्या अनेकांच्या मार्गदर्शक होत्या. विमल दिवस हा कार्यक्रम म्हणजे निर्वाणानंतर मनातील भावना व्यक्त करणाऱ्यासाठीचे व्यासपीठ होय, असे प्रवीण टाके म्हणाले.

1980च्या दशकापासून चंद्रपूरचा नव्हे तर विदर्भ आणि राज्यभरात महिला चळवळी त्यांचे अमूल्य असे योगदान राहिलेले आहे. तब्बल चार दशकांची सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक वाटचाल त्यांच्या कडून घडली. अतिशय सुंदर अशा कविता, नाटक व लेख त्यांनी लिहिले. त्यांच्या विविध क्षेत्रातील लेखणी चंद्रपूरच्या मातीला सुजलाम-सुफलाम करणारी ठरली आहे. ऋतुबंध, चांदणी, दरवळ, गुलमोहर हे त्यांचे कवितासंग्रह तर पार्टी हा त्यांचा विशेष कथासंग्रह आहे. 2008 मध्ये जिल्हा साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष पद प्राध्यापिक विमलताई गाडेकर यांनी भूषवलं होतं. आणि सन 1991 मध्ये सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा पहिला स्मिता पाटील पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या होत्या. जनता महाविद्यालय चंद्रपूर येथे समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून ज्ञानदानाचे उत्तम असे कार्य प्राध्यापिका विमलताई गाडेकर यांनी केले आहे.
साहित्यक्षेत्रात विमलताई गाडेकर यांचं नाव अजरामर राहणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापिका विमलताई गाडेकर यांच्या अप्रकाशित साहित्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्राध्यापिका विमलताई गाडेकर यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रफीत सादर करण्यात आली.
तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व विमलताई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वरिष्ठ सहाय्यक संचालक अर्चना शंभरकर तर संचालन एकता बंडावार यांनी केले. यावेळी जयंत गाडेकर, हेमंत गाडेकर, डॉ. मोना पंकज हे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात कवी संमेलन पार पडले, प्राध्यापक पुनित मातकर यांच्या सूत्रसंचालनात कवी सहभागी झाले होते.

दिनचर्या न्युज