मत्स्य व्यवसायमंत्र्यांनी घेतली दखल; रामाळातील दूषित पाणी करणार खाली
मत्स्य व्यवसायमंत्र्यांनी घेतली दखल; रामाळातील दूषित पाणी करणार खाली


दुषित पाण्यातील मासोळ्या खाणार का? फेसबुक व ट्विटरवर पोस्टची दखल

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- १७ /१२ /२०२२
चंद्रपूर शहरातील रामाळा तलावात दूषित पाण्यामुळे मृत मासोळ्या आढळून येत आहेत. परिसरात दुर्गंधी सुटत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत होत्या. या संदर्भात समाज माध्यमातदेखील व्हिडीओ व फोटो प्रसारीत झाल्यानंतर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मस्त्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेत दूषित पाणी सोडून तलाव कोरडे करण्याचे निर्देश दिलेत.

चंद्रपूर शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक रामाळा तलाव मागील काही वर्षांपासून दूरावस्थेत सापडला होता. इको प्रो या सामाजिक संघटनेने आंदोलन केल्यानंतर या तलावाच्या सौंदर्यकरण आणि स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्यात आला. राज्य शासनाने निधी दिल्यानंतर या तलावातील इकोर्निया वनस्पती काढण्यात आली. मागील वर्षी त्यासाठी खनिज विकास निधीअंतर्गत निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, पावसाळ्यामध्ये हे काम थांबले. पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी तलावात तुडुंब भरले. सध्या तलावात मोठ्या प्रमाणात पाणी आहे.

चंद्रपूर शहरातील नागरिकांना फिरायला येण्यासाठी एकमेव तलाव आहे. या तलावाच्या परिसरात रोज सायंकाळी आणि सकाळी देखील मोठ्या प्रमाणात तरुण आणि वृद्ध नागरिक येत असतात. मात्र, पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली. या संदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना तलावातील पाणी सोडण्याची सूचना केली. शिवाय तलावातील सौंदयीकरण, खोलीकरण, स्वच्छतेसाठी बैठक घेण्याचे सूचित केले.

त्यानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज 17 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला विशेषकार्य अधिकारी श्री. इंगोले, मनपाचे आयुक्त विपिन पालीवाल, मनपाचे माजी उपमहापौर राहुल पावडे, इको प्रो अध्यक्ष बंडू धोत्रे, डॉ. गुळवणे यांची देखील उपस्थिती होती.फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट
शहराच्या काही भागातील वस्त्यांमधून सांडपाणी येत असल्याने तलावातील पाणी दूषित होऊ लागले आहे. त्यामुळे येथे असलेल्या मासोळ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. तलावाच्या पाण्यात मृत मासोळ्यांचा ठीक साचून आहे.तलावातील पाण्यातील दूषितपणामुळे दुर्गंधी सुटली. या भागात राहणाऱ्या नागरिकांना आणि व्यवसाय करणाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात १६ डिसेंबर रोजी शहरातील एका पत्रकाराने फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट करीत #चंद्रपूर च्या नागरिकांनी अशा दूषित पाण्यातील मासोळ्या खायच्या का? असा प्रश्न उपस्थित करीत भावना व्यक्त केल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दखल घेऊन नागरिकांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने तलावातील पाणी सोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.