चांदा क्लब ग्राउंड येथे विभागीय सरस व हिराई महोत्सवाचे उद्घाटन chandrapur





महिला बचत गटाच्या उत्पादन विक्रीसाठी जिल्ह्यात व्यापारी संकुल उभे करणार
- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार*

चांदा क्लब ग्राउंड येथे विभागीय सरस व हिराई महोत्सवाचे उद्घाटन

दिनचर्या न्युज :- 
चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या माध्यमातून महिला बचत गटांची मोठी शक्ती आज जिल्ह्यात उभी झाली आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ग्राहक मिळावे, यासाठी अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र या बचत गटाच्या उत्पादित वस्तूंना कायमस्वरूपी ग्राहक मिळावा, यासाठी जिल्ह्यात सुंदर, अप्रतिम आणि आकर्षक असे व्यापारी संकुल उभे करणार असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चांदा क्लब ग्राउंड येथे विभागीय सरस व हिराई महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार प्रतिभा धानोरकर, किशोर जोरगेवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे आदी उपस्थित होते.

राज्याचा अर्थमंत्री असताना सन 2018 - 19 मध्ये अर्थसंकल्पात महिला बचत गटांसाठी जिल्हास्तरावर व्यापारी संकुलाची संकल्पना आपण मांडली होती, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, कृषी विभाग किंवा जुबली हायस्कूलच्या संभावित जागेवर बचत गटाच्या उत्पादित माल विक्रीसाठी व्यापारी संकुल तयार करण्यात येईल. जबरदस्तीने कोणतीही वस्तू आपण ग्राहकांवर थोपवू शकत नाही, हा बाजाराचा स्वभाव आहे. आपल्या वस्तूमध्ये काहीतरी वैशिष्ट्य असले तरच ग्राहक त्याकडे आकर्षित होतात. उत्पादन निर्मितीचे हे वैशिष्ट्ये आणि कौशल्य विकसित करण्यासाठीच चंद्रपुरात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे उपकेंद्र आपण उभे करीत आहो. या विद्यापीठाच्या माध्यमातून महिलांना वस्तू निर्माण करण्याचे चांगले तंत्रज्ञान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाने कालच महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे एसटी बसमध्ये सर्व महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत मिळणार आहे. महिलांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अद्भुत गुण असतात. आपल्या समाजात स्त्री शक्तीचा नेहमी सन्मान केला जातो. स्त्रियांमध्ये सहजभाव व प्रेमभाव ठासून भरलेला असतो. सोबतच आपल्यावर कोणाचीही कर्ज राहू नये, असा स्वाभिमान महिलांमध्ये आढळतो. त्यामुळेच महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण 99 टक्के आहे. उद्योग, व्यापार, व्यवसायाचा पराक्रम दाखविण्याची संधी या महोत्सवातून महिलांना मिळणार असून चंद्रपूरचा गौरव वाढवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून 75 मैदाने विकसित करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्यासाठी 'खेलो चांदा अभियानाचे' सुद्धा उद्घाटन झाले, असे त्यांनी सुरुवातीला घोषित केले. येथे सादर करण्यात आलेले लेझीम नृत्य, आदिवासी नृत्य अतिशय उत्कृष्ट होते. महिलांना नाविन्यपूर्ण कार्य करण्याची शक्ती देवाने दिली आहे. उमेदच्या महिलांच्या मानधनासंदर्भात मुंबईत सचिव स्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही सुद्धा पालकमंत्र्यांनी दिली.

यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, उमेद या शब्दातच एक आशा आहे. ग्रामीण भागात उमेद काम करीत असून महिलांचे सक्षमीकरण व बळकटीकरण करण्यावर त्यांचा जोर असतो. उमेद मध्ये 75 टक्के वाटा केंद्राचा तर 25 टक्के वाटा राज्याचा आहे. बचत गटाचे आर्थिक व्यवहार अतिशय पारदर्शक असून उमेदच्या उत्पादन विक्रीसाठी व्यापारी संकुल तसेच महिला बचत भवन उभे केले पाहिजे, अशी मागणी आमदार श्रीमती धानोरकर यांनी केली.

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, सकाळी पावसाने हजेरी लावली आणि काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा सुद्धा संप आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेने या हिराई महोत्सवाचे अतिशय उत्कृष्ट आयोजन केले आहे. आशा व अंगणवाडी सेविकांच्या मानधनाप्रमाणेच उमेदच्या महिलांचे मानधन वाढवावे. उमेदमुळे ग्रामीण भागात परिवर्तन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी एक बाजारपेठ मिळावी, त्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आर्थिक सक्षम झाली झाली तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. उमेदच्या माध्यमातून आतापर्यंत 180 कोटी रुपयांचे कर्ज महिला बचत गटांना मिळवून देण्यात आल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार म्हणाले, जिल्ह्यात उमेदचे 20 हजार महिला बचत गट कार्यरत असून 1048 गावात महिलांचे ग्रामसंघ तयार झाले आहे. 55 प्रभाग संघ , 674 उत्पादक संघ महिलांचे आहेत. एवढेच नाही तर महिलांच्या 10 उत्पादक कंपन्या जिल्ह्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते 'खेलो चांदा अभियानाच्या' लोगोचे अनावरण आणि नवरत्न स्पर्धा पुरस्काराचे वाटपही करण्यात आले. यात आदेश बनसोड (कथाकथान स्पर्धा), वेदांत निमगडे (वादविवाद), गुंजन गडपल्ले (स्मरणशक्ती), वैष्णवी फुंडे (सुंदर हस्ताक्षर), रहितखान पठान आणि परशुराम डाहुले (बुद्धिमापन) आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते रामू वाढई, निखिल उकडे, विलास वन्नेवार आणि बापूजी अडबाले यांना ई - रिक्षा वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन एकता बंडावार आणि सूर्यकांत भडके यांनी केले.आभार गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दिनचर्या न्युज