त्या हल्लेखोरांना अटक करून अहवाल सादर करा - पालकमंत्री मुनगंटीवार यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश -





त्या हल्लेखोरांना अटक करून अहवाल सादर करा
पालकमंत्री मुनगंटीवार यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश

*रावतांवरील हल्ल्याची मुनगंटीवारांनी घेतली गंभीर दखल*


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
कॉंग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गेल्या आठवड्यात (ता.11 मे ) मूल येथे गोळीबार झाला होता. यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वारंवार जिल्हा पोलिस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश दिले होते.परंतू एक आठवडा लोटूनही पोलिसांच्या हाती काही ठोस लागले नाही.परिणामी हल्लेखोर अद्यापही मोकाट आहेत.त्यामुळे आता मुनगंटीवारांनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांना लेखी पत्र देत हल्लेखोरांवर अटकेची कारवाई करीत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.संतोष रावतांवरील प्राणघातक हल्ल्याची गंभीर दखल मुनगंटीवारांनी घेतल्याची चर्चा आता होत आहे.

*अशी घडली होती ती दुर्दैवी घटना*
मूल येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेसमोरून दुचाकीने रावत जात असताना चारचाकी (एम.एच.34-6125) वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. हल्लेखोरांनी चेहरे झाकले होते. गोळी झाडताच हल्लेखोर नागपूरच्या दिशेने पसार झाले. यात हल्ल्यात रावत यां डाव्या हाताला जखम झाली होती.
या गोळीबारात कॉंग्रेस नेते संतोष रावत सुदैवाने थोडक्यात बचावले. त्याच्या डाव्या हाताला गोळी चाटून गेली. या घटनेने राजकीय वर्तुळ हादरले.दरम्यान मूल येथे सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला होता. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या अटकेसाठी निदर्शनेही केली होती.आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी नऊ पथक गठीत केली.पण,त्याचा पाहिजे तसा उपयोग झाला नाही.

*म्हणून पालकमंत्र्यांना लिहावे लागले पत्र*

जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या राजकीय
नेत्यावर गोळीबार होण्याची ही पहिलीच घटना आहे. रावत यांचे कुणाशीही वैर नाही. मात्र, त्यांच्यावर पाळत ठेवून गोळी झडली गेली, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.आठवडा उलटून गेला तरीही हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही.संतोष रावत यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ल्याचा मास्टर माईंड शोधून त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी लाऊन धरण्यात आली आहे.यासाठी मध्यवर्ती बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क केला.सातत्याने या प्रकरणाचा फॉलोअप भ्रमणध्वनिवरून घेतला.आरोपींना अटक करण्यासंदर्भात त्यांनी पोलिस अधीक्षकांना निर्देश दिले होते. तरीही आरोपी अद्याप मोकाटच आहेत. म्हणून आज (ता. 19) मुनगंटीवारांनी पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे. 'हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी व सविस्तर अहवाल कळवावा.असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आतातरी आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.