नॅनो युरिया व डीएपी खतांच्या वापराने होणार शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 28: केंद्र शासनामार्फत सन-2022 पासून नॅनो युरीया व यावर्षीपासून नॅनो डीएपी या विद्राव्य खतांचा वापर वाढविण्याकरीता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरीता ईफको या सहकार क्षेत्रातील कंपनीद्वारे नॅनो युरीया व नॅनो डीएपी या विद्राव्य खतांचा वापर वाढावा, यासाठी रथाद्वारे प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी या प्रचार व प्रसिद्धी रथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ केला. शेतकऱ्यांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापरल्यास पारंपारीक खताएवढेच फायदे होणार असून ही खते पारंपारीक खतांच्या तुलनेने स्वस्त असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक बचत होणार असल्याबाबतचे मत जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांनी नॅनो युरीया व नॅनो डीएपी फवारणीकरीता एक बॉटल (500मिली) प्रति एकरी पुरेसे असून याची कार्यक्षमता पारंपारीक खतांपेक्षा जास्त असल्याबाबत उपस्थितांना सांगितले.
नॅनो युरिया व नॅनो डीएपी हे एक नत्र व स्फुरद युक्त आधुनिक खत असून पिकांच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक असणारे नत्र व स्फुरद या अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात. नॅनो युरिया मध्ये नत्राचे कण हे अतिसूक्ष्म असल्यामुळे ते एकसंघ असतात व पृष्ठभागीय क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे त्याची कार्यक्षमता पारंपारीक युरियापेक्षा जास्त असते. तसेच नॅनो डीएपीमध्ये कणांचा आकार 100 नॅनोमीटर पेक्षा कमी असल्याने बियाणे मुळांच्या आत किंवा पानांवर उपलब्ध रंध्रछिद्रातून आणि इतर छिद्रातून सहज प्रवेश करू शकतात. नॅनो डीएपीचा उपयोग सीड प्रायमर म्हणून केल्यास बियाण्यांचे लवकर अंकुरण होऊन पिकाची जोमाने वाढ व गुणवत्ता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरते. नॅनो युरिया व नॅनो डीएपी ही विद्राव्य खते सर्व पिकांकरीता नत्र व स्फुरदाचा उत्तम स्त्रोत असल्याने याच्या वापराने पिकातील नत्र व स्फुरदाची कमतरता दूर होत. परिणामी, पिकांच्या उत्पादकतेत वाढ होऊन खर्चात बचत होत असल्याने शेतकऱ्यांच्या एकूण आर्थिक उत्पन्नात वाढ होते.
सदर नॅनो युरिया व नॅनो डीएपी प्रचार व प्रसिद्धी रथाच्या उद्घाटनाप्रसंगी कृषी विकास अधिकारी वीरेंद्रसिंह राजपूत, मोहीम अधिकारी लंकेश कटरे, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे रसिक बच्चूवार, ईफकोचे क्षेत्र अधिकारी चेतन उमाटे आदींची उपस्थिती होती.
दिनचर्या न्युज