राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्ड काढावे – सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन





राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्ड काढावे – सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

दिनचर्या न्युज :-
पुणे, दि. 27 जुलै - आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा)चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला असून, राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक असल्यामुळे सर्वांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि ती ही डिजिटल स्वरूपात मिळावी म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. सामान्यतः रुग्ण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कागदी फाईल दिली जाते. दरवेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल सोबत बाळगावी लागते. त्याचप्रमाणे डॉक्टरांनासुद्धा मागील सर्व रिपोर्ट्स तपासून पहावे लागतात. या सर्व बाबीचा विचार करता शासनाकडून आता नागरिकांना आभा आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. आभा आरोग्य कार्ड म्हणजेच आयुष्मान भारत आरोग्य खाते होय. आभा कार्ड नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी मिळणार असून, या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या, केलेले उपचार इत्यादी माहिती साठविली जाणार आहे. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आभा कार्डवर साठविली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार इत्यादी माहिती समजण्यास जलद आणि सोयीस्कर मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.

आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे. या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

*ABHA Health Card साठी आवश्यक कागदपत्रे*
- आधारकार्ड
- आधार लिंक मोबाईल क्रमांक

*हेल्थ कार्डचे फायदे काय असतील ?*
- इलाज करण्यासाठी प्रत्येक जागी रिपोर्ट आणि कागदपत्र घेऊन जाण्याची गरज नाही.
- आभा कार्डमध्ये तुमचा ब्लड ग्रुप, आजार, मेडिकल इत्यादीबदलची संपूर्ण माहिती असेल.
- ऑनलाईन उपचार, टेलीमेडिसिन, ई- फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड इत्यादी सुविधा यामध्ये नागरिकांना मिळतील.
- तुमचा मेडिकल रिपोर्ट किंवा रेकॉर्ड सहजरित्या तुम्ही हॉस्पिटल, मेडिकल, इन्शुरन्स यांना शेअर करू शकाल.

*आभा आरोग्य कार्ड कसे काढावे ?*
तुम्ही भारतात कुठेही राहत असाल तरी ही तुमच्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पध्दतीने हेल्थ कार्ड काढू शकता. मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाईन पध्दतीने हेल्थ कार्ड कसे काढावे ते जाणून घेऊ या.

स्टेप 1: आभा कार्ड बनविण्यासाठी तुम्हाला नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अधिकृत संकेतस्थळ healthid.ndhm.gov.in वर जावे लागेल. नंतर होम पेज वर ‘Create ABHA Number' असे बटन असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
स्टेप 2: नंतर पुढच्या पेजवर तुमच्या समोर आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील. म्हणजेच तुम्ही तुमच्या 1) आधार कार्ड, 2) ड्रायविंग लायसन्सचा वापर करून तुमचे हेल्थ कार्ड तयार करू शकता.
नोट – जर तुमच्या आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक नसेल तर तुम्ही ड्रायविंग लायसन्स पर्याय निवडा. कारण पुढे जेव्हा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकणार आहात तेव्हा तुम्हाला आधार लिंक मोबाइल नंबर वर ओटीपी येईल.
स्टेप 3: पुढच्या पेज वर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर आणि ‘I Agree’ वर क्लिक करून ‘i am not robot’ वर क्लिक करायचे आहे व कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर ‘Submit’ या बटनवर क्लिक करायचे आहे. नंतर आधार लिंक मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तो बॉक्स मध्ये टाकून ‘Next’ बटनवर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4: त्यानंतर तुम्हाला ‘Aadhaar Authentication Successful’ असा मेसेज दिसेल, आणि आधारमध्ये फिड असलेली तुमची वैयक्तिक माहिती खाली दिसेल. ती एकदा चेक करून नंतर तुम्हाला Next बटनवर क्लिक करायचे आहे.
स्टेप 5: आत्ता तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकायचा आहे, जो ‘ABHA’ कार्डला लिंक होईल व पुढे जाऊन तो लॉगिन करताना कामी येईल.
स्टेप 6: पुढच्या पेज वर तुमचा ‘ABHA’ नंबर तयार झाल्याचा मेसेज दिसेल. हा नंबर ऑटोमॅटिक तयार होतो, जसा आधार नंबर असतो तसा. हा 14 अंकी नंबर लक्षात ठेवणे कठीण जाते. त्यामुळे ‘आभा’ने आभा ऍड्रेस ही सुविधा चालू केली आहे. यामध्ये आपण आपले आवडते नाव ऍड्रेस म्हणून वापरू शकतो जसे, name1234@abdm
त्यासाठी तुम्ही आधी ‘Link ABHA Address’ बटनवर क्लिक करा. नंतर ‘No’ वर टिक करून ‘Sign Up for ABHA Address’ बटनवर क्लिक करायचे आहे.
स्टेप 7: आत्ता तुम्हाला तुमचे आवडते नाव ABHA ऍड्रेस म्हणून तयार करायचे आहे, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये ते टाईप करून Create And Link बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्यासमोर ABHA नंबर, ABHA ऍड्रेसला यशस्वीपणे लिंक झाल्याचा मेसेज दिसेल. नंतर Go Back to your ABHA… बटनवर क्लिक करायचे आहे.
स्टेप 8: आत्ता लॉगिन करण्यासाठी तुम्हाला, ABHA नंबर किंवा तुमचा मोबाइल नंबर आणि जन्म वर्ष टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 9: आत्ता तुम्हाला OTP साठी कोणत्या मोबाइल नंबरवर OTP पाठवावा ते विचारले जाईल 1) आधार लिंक मोबाइल नंबर 2) ABHA नंबर लिंक मोबाइल नंबर. योग्य तो पर्याय निवडून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 10: पुढच्या पेज वर तुमचे ABHA नंबर कार्ड/हेल्थ कार्ड तयार होऊन येईल. तुम्ही ते Download ABHA number Card बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
स्टेप 11: जर कार्ड मध्ये काही माहिती चुकलेली असेल तर वरती My Account मेनू वर क्लिक करून Edit Details ऑपशन वर क्लिक करा. आणि उघडलेल्या पेजवर तुम्ही तुमची नवीन माहिती टाकून Submit बटन वर क्लिक करा. तसेच तुम्ही Set Password ऑपशन वर क्लिक करून आभा अकाउंटचा पासवर्ड सेट करू शकता.
या डिजिटल आभा आरोग्य कार्डचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी आपले ‘आभा’ कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.