अखेर पाचव्या दिवशी सूरक्षा रक्षक सोहेल खानचा मृतदेह सापडला



अखेर पाचव्या दिवशी सूरक्षा रक्षक सोहेल खानचा मृतदेह सापडला

सास्ती डम्पींग यार्ड मध्ये मातीत दडला होता मृतदेह

दिनचर्या न्युज :-
राजुरा : सास्ती खुल्या कोळसा खाणीत काम करणारा सुरक्षा रक्षक पाच दिवसापूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. शोध मोहीम सुरू असतांना आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास खाणीतील डम्पींग यार्ड मध्ये मातीत दडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाणीत कर्तव्यावर असलेला सुरक्षा रक्षक अचानक 24 मे रोजी बेपत्ता झाला होता. वेकोली प्रशासन व पोलीस प्रशासनाने शोधमोहिम सुरू केली होती. पहिल्या दोन दिवसात कोळसा खाणीतील मातीचे खोदकाम करून शोध घेतला गेला परंतू तो सापडला नव्हता. तेव्हा कुटूंबीयांनी शोधकार्य योग्य रीतीने होत नसल्याचा आरोप करीत आंदोलन पुकारून खाण बंद पाडली होती. तेव्हा प्रशासन अॅक्शन मोडवर येत शोधकार्यास गती आली. आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास डम्पींग यार्ड परिसरात मातीत दडलेल्या अवस्थेत सोहेल खान याचा मृतदेह सापडला.

मृतदेह सापडला अशी माहिती मिळताच कुटूंबीयांनी व कामगारांनी खाणीकडे धाव घेतली. योग्य मोबदला मिळाल्याशिवाय मृतदेह बाहेर नेणार नाही असा पवित्रा घेतला तेव्हा एरीया पर्सनल मॅनेजर यांनी लेखी स्वरूपात लिहून दिल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता नेण्यात आला. कोळसा खाणीत एक कामगार बेपत्ता होऊन त्याला शोधण्यासाठी तब्बल पाच दिवस लागले याबाबत कुटूंबिंयानी व कामागरांनी वेकोली प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

यादरम्यान वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक यांना घटनास्थळावर बोलविण्याची मागणी कुटूंबीयांनी व कामगारांनी केली परंतू त्यांनी घटनास्थळावर येणे टाळले यावरून त्यांचा कामगाराप्रती व शोकाकुल परिवाराप्रती असलेली अनास्था दिसून आली.