चंद्रपूरमधील अल्ट्राटेकच्या चुनखडी खाणींना खाण मंत्रालयाच्या भारतीय खाण ब्युरोकडून सर्वोच्च पंचतारांकित मानांकन




चंद्रपूरमधील अल्ट्राटेकच्या चुनखडी खाणींना खाण मंत्रालयाच्या भारतीय खाण ब्युरोकडून सर्वोच्च पंचतारांकित मानांकन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर: ०९ ऑगस्ट २०२४: अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडच्या चुनखडीच्या बारा खाणींना भारतीय खाण ब्युरोने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी पंचतारांकित मानांकन (फाइव्ह स्टार रेटिंग) बहाल केले आहे. ७ ऑगस्ट २०२४ रोजी माननीय कोळसा आणि खाणमंत्री यांच्या हस्ते दिल्ली येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अल्ट्राटेकच्या बारा चुनखडी खाणींपैकी ज्यांना पंचतारांकित मानांकन मिळाले आहे, त्यापैकी दोन महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. एक नोकारी चुनखडी खाण आहे, जी अल्ट्राटेकच्या एकात्मिक उत्पादन प्रकल्प आवारपूर सिमेंट वर्क्सचा भाग आहे; आणि दुसरी माणिकगढ सिमेंट चुनखडी खाण आहे, जी अल्ट्राटेकच्या एकात्मिक उत्पादन प्रकल्प माणिकगढ सिमेंट वर्क्सचा भाग आहे. नोकारी चुनखडी खाणीला सर्वोच्च पंचतारांकित मानांकन मिळण्याची ही सलग सहावी वेळ आहे आणि माणिकगढ सिमेंट चुनखडी खाणीला सलग तिसऱ्यांदा पंचतारांकित मानांकन मिळाले आहे.

याच कार्यक्रमात, माननीय केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री श्री. जी. किशन रेड्डी यांनी, भारतातील सर्वात मोठी सिमेंट आणि रेडी-मिक्स काँक्रिट (आरएमसी) कंपनी म्हणून खाणकामाच्या सर्व पैलूंमध्ये अनुकरणीय कामगिरी दाखविल्याबद्दल आणि भारताच्या खाण क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल अल्ट्राटेकचा पुरस्कार देऊन सत्कार केला. या सत्कार समारंभाला माननीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री श्री. सतीशचंद्र दुबे यांचीही उपस्थिती होती.

खाणकामातील उत्कृष्टतेसाठी अल्ट्राटेकचे प्रयत्न भारतीय खाण ब्युरोच्या शाश्वत खाणकाम, कार्यक्षम कार्यान्वयन आणि तंत्रज्ञानावर आधारित खनिज प्रक्रियेच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहेत. अल्ट्राटेकला आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी खनिजांच्या (चुनखडी, लोह खनिज, बॉक्साईट, शिसे जस्त, मँगनीज) सर्व श्रेणींमध्ये सर्वाधिक संख्येने खाणींसाठी पंचतारांकित मानांकन (५-स्टार रेटिंग) प्रदान करण्यात आले आहे.

खाण मंत्रालयाने संकल्पित केलेले स्टार रेटिंग हे खाणकामातील शाश्वत विकास आराखड्याच्या व्यापक आणि सार्वत्रिक अंमलबजावणीसाठी सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यावर आधारित आहेत. रेटिंग योजनेतील सर्वोच्च असे ५-स्टार रेटिंग हे, वैज्ञानिक आणि कार्यक्षम खाणकाम, मंजूर उत्पादनाचे पालन, शून्य कचरा खाणकाम, पर्यावरण संरक्षण, प्रगतीशील आणि अंतिम खाण बंद करण्यासाठी उचललेली पावले, हरित ऊर्जेचे स्त्रोत, जमिनीची पुनःस्थापन, आंतरराष्ट्रीय मानकांचा अवलंब, स्थानिक समुदायाशी प्रतिबद्धता आणि कल्याण कार्यक्रम, पुनर्वसन आणि इतर सामाजिक प्रभाव यासारख्या मापदंडांवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खाणींना दिले जाते.