मनपाकडून शहरातील 28 बिल्डरांवर गुन्हे दाखल, ब्लू लाईन वर बेकायदेशीर ले-आउट व फ्लाँट विक्री भोवली !





मनपाकडून शहरातील 28 बिल्डरांवर गुन्हे दाखल,
ब्लू लाईन वर बेकायदेशीर ले-आउट व फ्लाँट विक्री भोवली !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचे घर बांधायचे आहे. परंतु त्या मानाने शहरांमध्ये जागेची कमतरता भासत आहे. नेमका याच गोष्टीचा फायदा घेत शहरातील काही बिल्डर लोकांची फसवणूक करत असल्याचा पर्दाफाश मनपाच्या कारवाई केला आहे.
इरई नदीच्या काठावर वडगाव, गोविंदपूर विभागातील ब्लू लाईनमधील सात ठिकाण आरक्षित ठिकाणांवर बेकायदेशीर व्यवहार झाले. या व्यतिरिक्त महाकाली मंदिराजवळील ऐतिहासिक बैल बाजारासाठी आरक्षित जागेत देखील हाच प्रकार घडला. या दोन्ही ठिकाणी बेकायदेशीर ले-आऊट आणि प्लॉटची विक्री केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी चंद्रपूर महानगरपालिकेच्या सहायक नगर रचनाकार सारिका शिरभाते यांनी मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 53अ अन्वये रामनगर पोलीस ठाण्यात 23 भूखंडधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 5 बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात वरील कायद्याच्या कलम 52 व 53 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेने शहरातील 28 बिल्डरांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे . अवैध प्लॉट विक्री करणाऱ्या बिल्डरांना चांगलाच दणका बसलेला आहे. मात्र त्याचवेळी या कारवाईमुळे चंद्रपुरातील राजकीय टेंशन वाढलं आहे. कुणाच्या डोक्यावर कोणत्या पक्षाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

शहरात चांगलीच खळबळ माजली

सर्वाधिक 23 बिल्डरांवर एकाच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. चंद्रपुरातील रामनगर पोलीस स्टेशनअंतर्गत ही कारवाई झाली. तर पाच बिल्डरांवर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महानगरपालिकेच्या या धडक कारवाईमुळे चंद्रपूर शहरात एकच खळबळ माजली आहे. या संपूर्ण प्रकरणांमध्ये आता राजकीय वरदहस्त लाभलेले बिल्डर नेमकी काय भूमिका घेतात? त्यांचे पाठीराखे असलेले राजकीय पक्ष काय भूमिका घेतात? आणि ज्यांची प्लॉट खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक झालेले सामान्य नागरिक काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

स्थानिक रामनगर पोलिस ठाण्यात २३ प्लॉटधारकांविरुद्ध MRTP 1966 च्या कलम 53A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 5 बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात कलम 52 आणि 53 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुक्तांची भूमिका
चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन पालीवाल यांच्याशी संपर्क साधला. नागरिकांनी ब्लू लाईन असलेल्या या भागातील अशा प्रकारचे प्लॉट खरेदी करू नये. ज्यांनी प्लॉट खरेदी केले असतील त्यांनी त्या ठिकाणी नवीन बांधकाम करू नये. आणि कोणीही केवळ नोटरीवर प्लॉटची खरेदी-विक्री करू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.