राज्यातील महायुती मुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, व सर्व सामान्य जनता त्रस्त - आ.सुभाष धोटे




ही लढाई संविधान परिवार विरुद्ध संघ परिवार आहे- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार*

राज्यातील महायुती मुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, व सर्व सामान्य जनता त्रस्त - आ.सुभाष धोटे

दिनचर्या न्युज :-
राजुरा, दिनांक १४- महाराष्ट्रात दोन पक्ष फोडून स्थापन करण्यात आलेले घटनाबाह्य, महाभ्रष्ट महायुती सरकार हे आरक्षणाच्या विरोधी आहे. प्रचंड महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे संविधान परिवार विरुद्ध संघ परिवार लढाई आहे अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
त्यांनी कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष धोटे यांच्या प्रचारार्थ सभेस संबोधित केले.

या सभेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सुभाष धोटे, प्रभारी संपत कुमार, उत्तम पेचे,विजय बावणे, अरुण धोटे, आशा खासरे, सविता टेकाम, ॲड.अरुण धोटे, स्वामी येरोलवार, अशोक बावणे, पापय्या पोनामवार, श्याम राऊत, संभाजी कोवे, अंकुश धाबेकर व अन्य मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.

पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राजुरा क्षेत्र हे औद्योगिक क्षेत्र असून भाजपच्या महायुती सरकारने संपूर्ण औद्योगिक क्षेत्राला अदानीच्या दावणीला बांधले आहे. सुभाष भाऊ धोटे हे निवडून येतील, आम्ही कष्ट करणाऱ्या कामगारांसाठी दोघे मिळून लढत राहू. सोयाबीन, कापूस धान या शेती उत्पादनाला रास्त भाव मिळत नाही. उलट रासायनिक खते, बियाणे, फवारणीसाठी लागणारे औषध व इतर साहित्याच्या प्रचंड दरवाढीने शेतकरी कर्जात बुडाला आहे. अपक्ष उमेदवार निवडून येऊन जनमताचा आदर न करता केवळ स्वार्थापोटी सत्तेच्या मागे पळतात असा टोला यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांचे उदाहरण देत लगावला.येथील शेतकरी, कामगार व सर्व सामान्य यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष धोटे यांना विजयी करा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तर महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सुभाष धोटे यांनी शेतकरी पुत्र म्हणणारे शेतकरी संघटनेचे उमेदवार ॲड. चटप यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून 1990 पासुन प्रत्येक वेळी निवडणूक आली की बाशिंग बांधले केले आहे, अशी धोटे यांनी टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतमालाला रास्त भाव मिळत होता. आमच्या पक्षाने पंचसूत्री कार्यक्रम वचननाम्यात जाहीर केला असून यात महिला युवक, युवती, शेतकरी, कामगार , यांना विविध योजनांचा लाभ मिळणार असून सर्वांचे हित जोपासले जाणार असल्याचे आ.सुभाष धोटे म्हणाले.पण अपक्ष उमेदवाराकडे असे व्हिजन नसते अशी टीका यावेळी त्यांनी केली.