वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख रुपये

 वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील:सुधीर मुनगंटीवार

            मुंबई/प्रातिनिधी:
वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आता 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.


            अलिकडेच ठार मारलेल्या अवनी वाघीण संदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना श्री. मुनगंटीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, टी-1 वाघिणीने        13 जणांचा बळी घेतल्यानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तीला पकडण्यासाठी वन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु ती सापडत नव्हती. मध्यप्रदेश शासनाकडून चार हत्ती बोलावण्यात‍ आले होते. तसेच वन विभागाचे 200 अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच वन क्षेत्रामध्ये 100 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. परंतु तरीही वा‍घिणीचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यानंतर पॅराग्लायडर, इटालियन कुत्रे, सुगंधीत द्रव्ये, थर्मल सेंसर ड्रोन इत्यादींचा वापर करण्यात आला. तरीही वाघिणीचा शोध लागला नाही.

त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी बोराटी-वरुड-राळेगाव रस्त्यावर गस्त करणाऱ्या वन विभागाच्या चमूला अवनी वाघीण दिसली तेव्हा तीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वाघिणीने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चमूतील सदस्यांकडून नरभक्षक वाघिणीस (टी-1) ठार करण्यात आले. ही सर्व कार्यवाही न्यायालयाचे आदेश आणि वन विभागाचे नियम पाळूनच करण्यात आली.

            वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना यापूर्वी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येत होती. आता मदतीत वाढ केली असून ती रुपये 15 लाख एवढी करण्यात आली आहे. वन्य प्राणी व नागरिक दोघांचाही जीव महत्वाचा असून दोघोचेही संरक्षण कसे करता येईल, तसेच वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासठी प्रयत्न करणार असून याबाबत लवकरच तोडगा काढणार आहोत. असे श्री. मुनगंटीवार म्हणाले. लवकरच देशभरातील वनमंत्री आणि वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करणार असून त्यात वन्यजीवांचे आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तसेच नव्याने कायदे करण्यासंदर्भात काही सूचना/शिफारशी केंद्र सरकारकडे पाठविणार आहोत. त्याचबरोबर जंगल परिसरातील कोअर सेक्टरमधल्या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेत सर्वश्री सदस्य जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, श्रीमती यशोमती ठाकूर,  प्रशांत बंब यांनी सहभाग घेतला