ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मचाण पर्यटनाला सुरूवात

चंद्रपूर/प्रतिनिधी:            
हमखास व्याघ्र दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्रात ३० नोव्हेंबरपासून प्रथमच मचाण पर्यटनाला सुरूवात झाली आहे. यामुळे पर्यटकांना व्याघ्रदर्शनासह ताडोबातील नैसर्गिक सौंदर्य जवळून अनुभवता येणार आहे. या नाविन्यपूर्ण पर्यटनाचा उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी लाभ घेणाऱ्या पुण्यातील तीन पर्यटकांचा वन विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प हमखास व्याघ दर्शनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. यामुळे देश-विदेशातील पर्यटक ताडोबात व्याघ्र दर्शनासाठी येतात. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ताडोबा प्रशासनाने बफर झोन क्षेत्रातील आगरझरी आणि देवाडा वनक्षेत्रात ३० नोव्हेंबरपासून मचाण पर्यटनला सुरू करण्यात आली आहे. या मचाण पर्यटनामध्ये सर्वप्रथम जिप्सीमधून फेरफटका मारून आणल्यानंतर मचाणावर सोडण्यात येणार आहे. पर्यटनाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील मंदार नायडू, श्रीनिवास नायडू यांनी आगरझरी वन परिसरातील मचाणावरून तर देवाडा येथील मचाणावर पर्यटक फिदा निरखवाला यांनी ताडोबातील व्याघ्रदर्शन व सौंदर्याचा आनंद लुटला. मचाण पर्यटनाचा प्रथमच लाभ घेणाऱ्या या पर्यटकांचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


मचाण पर्यटन नियम व अटी
पर्यटकास फॉर्म भरून देणे अनिवार्य आहे, दोन दिवस आधी बुकिंग करणे अनिवार्य राहील, मचान पर्यटनावर जाण्यापूर्वी पर्यटकास बंद पत्रे लिहून देणे अनिवार्य राहील, मचाणीवर बसण्याच्या वेळेस औषधी साहित्य पाणी स्वतः घेऊन यावे लागेल, मचाणीवर बसणे ही स्वतःची जबाबदारी असेल, मचाणीवर बसण्याकरिता स्वतःचे साहित्य सतरंजी चादर बेडशीट घेऊन यावे लागणार, एका मचानीवर एका वेळी फक्त दोन पर्यटक व एक गाईड बसू शकतो, धूम्रपान व मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे,माचानीवर बसल्यावर मोठ्या आवाजात बोलू व गप्पा मारता येणार नाही,प्लास्टिक सोबत आनता येणार नाही, केसांना सुगंधी तेल लावून येत येणार नाही, नये भडक रंगाचे किंवा पांढरे शुभ्र वस्त्रे परिधान करता येणार नाही, प्रसाधनगृहाची कुठलीही व्यवस्था नाही, वन्यजीव अधिनियम 1972 सुधारित 2006 मधील सर्व कलमे पर्यटकास बंधनकारक आहेत,नियमाचे पालन न झाल्यास पर्यटकावर कायदेशीर कारवाई करता येणार आहे.