' कथा विविधा ' या कथा संग्रहातील रूपरेषा व आशय अतीशय दर्जेदार:- डॉ स्नेहलता देशमुख

मुंबई/प्रतिनिधी:
ज्योती अळवणी लिखित ‘कथा विविधा’ या कथा संग्रहातील कोंटुर (रुपरेषा) व कंटेंट (आशय) अत्यंत दर्जेदार असून हा पहिला कथा संग्रह असला तरी त्यांच्या यशस्वी साहित्य यात्रेतील हे पहिले पाऊल ठरेल असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलताताई देशमुख यांनी केले. दोन पायांनी चालणे हा प्रवास असतो तर ह्रदय ओतून आपण चालतो तेव्हा ती यात्रा असते असे सांगत ज्योतीचे लिखाणही ह्रदय ओतून असल्याने ती साहित्य यात्रा ठरेल असेही त्या म्हणाल्या. कथा विविधा या ज्योती अळवणी यांच्या कथा संग्रहाच्या प्रकाशन सोहळयात प्रमुख पाहुण्या या नात्याने त्या बोलत होत्या.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना खासदार पूनमताई महाजन म्हणाल्या की पुस्तकातील सातही कथा या स्त्री केंद्रित असल्या तरी ‘तो आणि ती....’ या कथेतील कृष्णरुपी ‘तो’ स्त्रीच्या पूर्णत्वासाठी आवश्यक आहे हे देखील लेखिका सांगून जाते. नगरसेविका या नात्याने काम करतानाही लेखनासाठी ज्योतीताई वेळ काढतात याचे त्यांनी कौतुकही केले.
राजकारणी अनेकदा लोकहित लक्षात घेऊन कठोर निर्णय घेत असतात व त्यामुळे ते ड्राय असल्याचे भासत असते. कलाकार मात्र कलानिर्मितीत भावनीक निर्णय घेत असतो. तारेवरची कसरत करत ज्योतीताई या दोन्ही भूमीका साकारत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले.

अत्यंत वेगळेपणाने सादर झालेल्या प्रकाशन सोहोळयात अभिनेत्री चिन्मयी सुमीत हिने ‘एक रेड वाईन नातं’ या भावनीक कथेचे अल्पवाचन केले. तर ‘तो आणि ती....’ या पौराणीक कथे मधील कृष्णाचे मनोगत एकपात्री प्रयोगातून अभिनेता चिन्मय मांडलेकर याने उत्कृष्टपणे सादर केले. ‘लालीची गोष्ट’ ही सामाजीक विषयावरील कथा एका शॉर्टफिल्मच्या माध्यमातून प्रदर्शीत झाली. या तीनही कलाकृतींमधून वेगवेगळ्या विषयांवरील कथांच्या पुस्तकाचा एक आगळा वेगळा प्रकाशन सोहळा पार्लेकरांना अनुभवता आला. अगदी हाच धागा पकडत अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने कथा संग्रहातील सातही कथा या विविध प्रकारच्या आशयाच्या असून कथा विविधा हे नावही अत्यंत सुयोग्य आहे असे म्हंटले. ज्योती अळवणी यांनी सर्वच कथांविषयी आपल्या भाषणातून जो अल्प परिचय करून दिला आहे त्यामुळे पुस्तकाविषयी उत्सुकता वाढली असून लगेच हे पुस्तक वाचण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.

उपस्थित पार्लेकर रसिकांसोबत संवाद साधाताना अभिनेता स्वप्नील जोशी याने राजकारण्यांकडे लोक आपल्या समस्येच्या माध्यमातून नकारात्मकता घेऊन जातात; पण राजकारणी मंडळी ती समस्या सोडवत लोकांना सकारत्मकता देतात असे म्हटले. ज्योती अळवणी यांच्या कथा संग्रहातून ती संवेदनशिलता तर दिसतेच पण सृजनशीलताही जाणवते. कदाचित पार्ल्याच्या पाण्यात या सृजनशीलतेचे गमक असावे असेही आवर्जून मांडत पार्लेकरांचे मनही जिंकले.
ग्रंथाली प्रकाशनातर्फे बोलताना आपला आनंद व्यक्त करत लतिका भानुषाली यांनी ज्योतीताईंच्या पहिल्याच पुस्तकातून त्यांचा चांगला स्वभाव जाणवतो असे म्हंटले. कारण त्यांच्या प्रत्येक कथेत दुष्ट प्रवृत्तींचा पराभव होताना दिसतो. लेखिकेने अनेक मान्यवर लेखकांचा आपल्यावर प्रभाव आहे असे म्हंटले असले तरी सर्वच कथांमधून लेखिका म्हणून ज्योती अळवणी यांचाच प्रभाव दिसतो असेही त्या म्हणाल्या.
प्रकाशन सोहळयाच्या निमित्ताने या कथासंग्रहासाठी अनेकांची मदत व हातभार लागला असून अशा सर्व मान्यवरांचे आभार आमदार ऍड. पराग अळवणी यांनी मानले तर कार्यक्रमाचे संयोजक असलेल्या सोहम प्रतिष्ठान तर्फे विनीत गोरे यांनी सर्वांचे आभार मानले.