स्पर्धा पूर्व परीक्षा देण्याची आणखी एक संधी !

मिशन सेवामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 

     25 ते 27 पुन्हा ऑनलाईन नोंदणी करता येईल                          


तालुक्याच्या केंद्रावरून 29 डिसेंबरपर्यंत मिळणार प्रश्नपत्रिका

चंद्रपूर दि. 24 डिसेंबर : महाराष्ट्रातील आगामी मेगा भरती मध्ये चंद्रपूरचा नोकरीतील टक्का वाढावा यासाठी जिल्ह्यात सुरू झालेल्या अभिनव मिशन सेवा उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. 23 डिसेंबर रोजी झालेल्या स्पर्धा पूर्वपरीक्षा आयोजनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. मात्र याच दिवशी अनेक परीक्षा आल्यामुळे काही विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही.त्यांना पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा chanda.nic.in संकेतस्थळावर ऑनलाइन रजिस्ट्रेशनला 25 ते 27 या दोन दिवसांमध्ये सुरुवात होत आहे. या संधीचा फायदा घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पकतेतून साकारत असलेली मिशन सेवा ही मोहीम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. 23 डिसेंबरला विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा पूर्वपरीक्षा आयोजित करण्यात आली होती. तथापि, याच दिवशी राज्यसेवा व अन्य काही परीक्षा आल्यामुळे अनेक विद्यार्थी या चाचणी परीक्षेला येऊ शकले नाहीत. मात्र या सर्व विद्यार्थ्यांना 23 डिसेंबर रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणच्या केंद्रावरून विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहे.जे विद्यार्थी या परीक्षेला येऊ शकले नाही त्यांनी ही प्रश्नपत्रिका बल्लारपूर येथील जनता विद्यालय सिटी ब्रांच, भद्रावती येथील लोकमान्य विद्यालय, ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारणी कन्या विद्यालय, तसेच चंद्रपूर येथील जिल्हा परिषद जुबली हायस्कूल, तसेच न्यू इंग्लिश हायस्कूल चंद्रपूर, चिमुर येथील नेहरू विद्यालय, कोरपना येथील वसंतराव नाईक विद्यालय, मूल येथील नवभारत विद्यालय, नागभीड येथील जनता गर्ल्स हायस्कूल, पोंभूर्णा येथील जनता हायस्कूल, राजुरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल, सिंदेवाही येथील महात्मा फुले विद्यालय, वरोरा येथील हिरालाल लोया विद्यालय या केंद्रावरून उपलब्ध करून घ्यावी. 29 तारखेपर्यंत या प्रश्नपत्रिका या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील.

मिशन सेवा अंतर्गत राज्य शासनामार्फत होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तज्ञांचे मार्गदर्शन प्रशिक्षण तसेच आवश्यक साहित्याचे वाटपही या योजनेमध्ये केले जाणार आहे तथापि,या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातील परीक्षेसाठी पात्र असलेल्या युवकांना एमपीएससी पूर्व परीक्षेचे सराव परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. या सराव परीक्षा सत्रातील पहिली परीक्षा ही 23 डिसेंबर रोजी झाली आहे. आणखी पाच परीक्षांचे आयोजन दर रविवारी करण्यात येणार आहे.यामध्ये नामवंत तज्ञांचे लवकरच मार्गदर्शन सत्र सुरू होणार आहे.