3 फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर

मूल येथील महाशिबिराची तयारी अंतिम टप्प्यात

जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा
चंद्रपूर/प्रतिनिधी:

 मूल येथे रविवारी 3 फेब्रुवारी रोजी शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यशस्वीतेसाठी जनजागृती व प्रसिद्धी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

मूल येथील प्रशासकीय भवनात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय तसेच सर्व शासकीय विभागाच्या समन्वयातून या महाशिबिराचे आयोजन कर्मवीर महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात येणार आहे.

बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, महाशिबिर नियोजन समितीचे स्थानिक अध्यक्ष तथा मूलचे उपविभागीय अधिकारी एम.व्ही. खेडकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, विभागीय वनअधिकारी सोनकुसरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव किरण जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे, पोलीस निरीक्षक कासार आदीसह तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरस्थळाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शिबिरासाठी येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सूचना डॉ.खेमनार आणि पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी केल्यात. रुग्णवाहिका, अग्निशामन, पार्किंग आदी व्यवस्थांची पाहणी त्यांनी केली. मूल शहरासह तालुका आणि सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांनी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.