स्वच्छता अँप रँकिंगमध्ये पोंभुर्णा प्रथम क्रमांकाचा मानकरी



अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मानले पोंभुर्णा शहरवासीयांचे आभार 

चंद्रपूर/प्रतिनिधी:

राज्याचे अर्थमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील पोंभुर्णा नगर पंचायत स्वच्छता अँप रँकिंगमध्ये भारतात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आदिवासी बहुल पोंभुर्णा तालुक्याच्या विकासाने वेग घेतला आहे. पोंभुर्णा नगर पंचायतीच्या स्थापनेपासून या क्षेत्रात रस्ते विकास , पाणीपुरवठा या बाबींना अग्रक्रम देत त्यांनी शहरात विकासाचे विविध उपक्रम राबविले आहेत. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्कच्या माध्यमातून शहराच्या सौंदर्यात भर घातली गेली आहे. नव्या देखण्या बस स्थानकाचे बांधकाम सुरू झाले असून टूथपिक उत्पादन प्रकल्प , आयटीसी च्या सहकार्याने अगरबत्ती प्रकल्प , बांबू हॅन्डीक्राफ्ट अँड आर्ट युनिट असे विविध रोजगाराभिमुख उपक्रम शहरात कार्यान्वित झाले आहेत. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाची वास्तू शहरात उभी झाली असून लवकर जनतेच्या सेवेत रुजू होत आहे. पोंभुर्णा शहराचा चेहरामोहरा बदलत असताना पोंभुर्णा नगर पंचायत स्वच्छता अँप रँकिंगमध्ये भारतात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरल्याने शहराच्या विकासाला नवा आयाम प्राप्त झाला आहे.

याआधीही चंद्रपूर आणि बल्लारपूर ही रेल्वे स्थानके देशातील सर्वात सुंदर व स्वच्छ रेल्वे स्थानके म्हणून पुरस्कृत ठरली आहेत . पोंभुर्णा नगर पंचायत स्वच्छता अँप रँकिंगमध्ये भारतात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरल्याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा शहरवासीयांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले आहे